गोंदिया : लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्याने अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशा नागरिकांना वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय बनली आहे. गोंदिया शहरासह अनेकांना नोकरीच्या आमिषातून ऑनलाईन गंडविल्याचे प्रकार समोर येत असतानाच, नागरिकांनी अशा सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचा सल्ला पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिला.
लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे नोकरीच्या शोधात अनेकांनी क्विकर जॉबसारखे ॲप्लिकेशन किंवा जॉब मिळवून देणाऱ्या ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत, त्या कंपनीकडे नोकरीसाठी अप्लाय केले आहे. अनेकजण मोबाईल किंवा मेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करतात. त्यांना आपली वैयक्तिक माहिती देतात अनेकांना आता नोकरीबाबतचा कॉल येईल असे वाटत असते. परंतु त्यांच्या बँक खात्यातून लाखोंची रक्कम परस्पर काढून घेण्यात येत आहे. मोबाईल क्रमांक बँक अकौंटशी कनेक्ट असल्याने अशा तरुणांची फसवणूक होत आहे. जिल्ह्यातही लॉकडाऊन काळात अशा घटना घडल्या आहेत. नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडविल्याच्या घटना समोर आल्या. काहींनी पोलिसांत तक्रार दिली, तर काहींनी बदनामीखातर पोलिसात जाणे टाळले. इतरही प्रकारे नागरिकांनी सायबर भामट्यांकडून फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत.
..................
अशी करा खातरजमा...
१) कुठलीही कंपनी इंटरव्ह्यूशिवाय नोकरी किंवा ट्रेनिंग देत नाही. तसेच ऑफर लेटरही मेल करीत नाही. तेव्हा अशा प्रकारच्या ईमेल्सना उत्तर देणे टाळावे.
२) कुठलीही कंपनी, बँक, फायनान्शिअल संस्था विनाकारण कुणालाही बक्षीस देत नाही. शक्यतो अशी ईमेल्स स्पॅमपध्ये आपोआपच टाकली जातात. परंतु, शेवटी ती एक यंत्रणा आहे. त्यामुळे साहजिकच त्याला मर्यादा असतात.
३) आपण मात्र, सावध राहणे आवश्यक आहे. प्रलोभनात पडून अशा मेल्सना उत्तर देण्याचे टाळावे. सर्व खातरजमा करावी, त्यानंतरच वैयक्तिक माहिती संबंधितांना द्यावी, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.
.....................
अशी होऊ शकते फसवणूक...
१) एका तरुणाने वेबसाईटवर नोकरीसाठी अप्लाय केले होते. दोन दिवसात संबंधित कंपनीकडून मेल्स आले आणि वैयक्तिक माहिती विचारली. रजिस्ट्रेशनसाठी २० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करा, असे सांगण्यात आले. या युवतीने पैसे ट्रान्सफर करताच तिच्या खात्यातून ४० हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले.
२) लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने एका युवकाने काही कंपन्यांकडे जॉबसाठी अप्लाय केले होते. त्या कंपन्यांकडून युवकाला मेल्स आले. त्याला वर्क फ्रॉम होमसाठी नोकरी आहे असे सांगून ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. पण, काही वेळातच त्याच्या खात्यातून रक्कम कमी झाली.
३) घरीच बसून कमवा... महिन्याचे ३० हजार, असे मेसेज पाठवून त्यांच्या मोबाईलवर आलेल्या लिंकवर जाऊन तेथे सर्व वैयक्तिक माहिती विचारली. ती माहिती भरल्यानंतर अखेर त्या महिलेला काही रक्कम टाकून नोकरी पक्की करण्यास सांगण्यात आले. महिलेने पैसे भरताच रक्कम त्यांच्या बँकेतील खात्यावरून काढण्यात आली.
..............................
नोकरीच्या नावाखाली झालेली फसवणूक
२०१९ - ४
२०२० - ३
२०२१ - २
.........................
- संकेतस्थळाबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवा
- अनोळखी लिंक किंवा संकेतस्थळावर जाण्याचे टाळा
- धोकादायक आणि फेक संकेतस्थळांना ॲन्टिव्हायीसद्वारे ब्लॉक करा
..........................
कोट
नागरिकांनी सावध राहून कुठलीही वैयक्तिक माहिती, ओटीपी क्रमांक कुणालाही देऊ नये, नोकरीसाठी कॉल आल्यास संबंधित कंपनीशी संपर्क करून तसेच योग्य खातरजमा करूनच माहिती द्यावी.
- तेजस्विनी कदम, सायबर विभाग प्रमुख