गोंदिया : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव सुनील भालेराव, काँग्रेसचे जिल्हा महासचिव विशाल शेंडे, माजी न.प.सभापती गज्जू नागदेवे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह रविवारी (दि.२०) स्थानिक पीपी कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा झटका मानला जात आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षात इनकमिंग आणि आऊट गोईंगचे सत्र सुरु झाले आहे. त्यातच रविवारी सुनील भालेराव, विशाल शेंडे, गज्जू नागदेवे, माजी नगराध्यक्ष रमेश ठाकरे, भाजप अनुसूचित जाती जिल्हा युवा मोर्चाचे संपर्क प्रमुख वसंत गणवीर, डाॅ. राजेंद्र वैद्य, बशीरभाई कुरैशी,कबीर सुखदेवे, माजी सभापती विकास शेंडे, फैयाद पठान, मिलिंद नागदेवे, आकाश गडपायले, नैतराम गौतम, किशोर गजभिये, सुदर्शन वाहने, बेंजामिन लारेंस, नौशाद जाफरी, पास्टर महेंद्र शेंडे, धीरज रुपारेल, रामप्रसाद गौतम आदी कार्यकर्त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या विकास कामांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे खा. प्रफुल्ल पटेल, माजी आ. राजेंद्र जैन यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, शहराध्यक्ष अशोक शहारे, विनोद हरिणखेडे, केतन तुरकर, रफीक खान आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने निवडणुकीपूर्वीच हा धक्का मानला जात आहे.
...........
जनसामान्यांपर्यंत पक्षाचे कार्य पोहचवा : प्रफुल्ल पटेल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य व कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो की सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस लावण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जात आहे. टीका करण्यापेक्षा आमचा प्रत्यक्ष काम करण्यावर विश्वास आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सदैव प्रयत्नरत आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुध्दा सर्वसामान्यांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे काय आहेत याची माहिती पोहचून त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करावे. जनता जनार्धनच आपली खरी ताकद आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आपण सदैव खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिली.