गोरेगाव (गोंदिया) : तालुक्यातील हिराटोला येथील नौसेनेतील मुकुल देवेंद्र बोपचे व तिरोडा तालुक्यातील खैरबोडी येथील भार्गव साहेबराव भगत हे दाेन्ही सैनिक १४ जुलैला फ्रान्सला होणाऱ्या बॅस्टिल परेडमध्ये सहभागी होणार आहेत.
१४ जुलै हा दिवस फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात १७८९ मध्ये याच दिवशी बॅस्टिलपासून या क्रांतीची ठिणगी पेटली होती. यावर्षी ‘बॅस्टिल डे’च्या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. भारतीय नौदलाच्या तुकडीत आपल्या विदर्भातील २ शौर्यवीर सहभागी होणार आहेत. पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्यातून बॅस्टिल परेडसाठी निवड झाली आहे. ही बाब गोंदिया जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद असून यामुळे जिल्हावासीयांची मान उंचावली आहे.
मुकुल देवेंद्र बोपचे मागील दोन वर्षांपासून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली राजपथावरील परेडचा अनुभवी सैनिक राहिला आहे. मुकुल आणि भार्गव अवघ्या वयाच्या १९ वर्षात भारतीय नौसेनेत रुजू झाले. मुकुल आणि भार्गव यांनी जागतिक स्तरावर आपल्या देशाचे व राज्याचे आणि विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. संपूर्ण गोंदिया जिल्हा या परेडची आतुरतेने वाट बघत आहे.