सुखदेव कोरे - सौंदडपुलाच्या मधल्या भागातील लोखंडी पत्रे न काढल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच पुराचे पाणी सरळ वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. पुराच्या पाण्यास लोखंडी पत्र्याने अडविल्याने पुराचे पाणी पुलावरून व पुलाच्या दोन्ही कडेने वाहू गेले. पुराच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाच्या दोन्ही कडेला मोठ-मोठी भगदाडे पडली आहेत. या पाण्याने पुलाला तडा गेला. पुलावरील पुर्ण रस्ता उखडल्याने या मार्गावरून सध्या पायदळ वाहतुक सुरू आहे. चार चाकी वाहनांची वर्दळ बंद पडली आहे. सौंदड ते राका (पळसगाव) या गावाला जाणाऱ्या रोडवर चुलबंद नदीच्या पात्रात ११ वर्षापूर्वी कोल्हापुरी पॅटर्नच्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. त्या कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे नदीकाठच्या अनेक गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली. दरवर्षी या बंधाऱ्याच्या दरवाज्यावर सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी-शेवटी या दरवाज्यावर लोखंडी पाट्या बसवून पाणी अडविण्यात येते. जुन-जुलै महिन्यात पावसाळ्याच्या सुरूवातीस या पाट्या काढण्यात येतात. या बंधाऱ्यामुळे भर उन्हाळ्यात सुध्दा या बंधाऱ्यात पाणी अडून राहत होते. यामुळे उन्हाळ्यात परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नव्हते. धरणात लोखंडी पत्रे लावण्याचे काम राका येथील स्थानिक पाणी वाटप सोसायटी व शेतकऱ्यांच्या मदतीने करण्यात येते, दरवर्षी पावसाळ्यात बंधाऱ्यावरील पूर्ण लोखंडी पत्रे काढण्यात येत असे. त्यामुळे पुराचे पाणी अडत नव्हते. परंतु या वर्षी पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रात्रीचे वेळी या ठिकाणी मोठा अपघात होऊन मोठी हाणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर मार्गावरून गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. पावसाळा सुरू होण्यापुर्वीच या पुलाखाली लावलेले लोखंडी पत्र काढले असते तर पुलाचे किंवा रस्त्याचे नुकसान झाले नसते. एका चुकीमुळे आता पुलाची व रस्त्याची समस्या उत्पन्न झाली आहे. सबंधीत विभागाला या विषयी सूचना करून सुध्दा याकडे कुणाच्या लक्ष घालण्याची वेळ नाही. सदर पुलाची तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील जनतेने केली आहे.
सौंदड-राका पुलावर पुरामुळे पडले मोठे भगदाड
By admin | Published: July 27, 2014 11:49 PM