विजय मानकर सालेकसामुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वे मार्गावर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेअंतर्गत येणारे सालेकसा रेल्वे स्टेशन हे काही एक्सप्रेस गाड्यांचा थांबा असणारे महाराष्ट्रातील पूर्वेकडील पहिले स्टेशन आहे. तालुका मुख्यालयी असलेल्या या स्टेशनवर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. मात्र एकीकडे गोंदियासारख्या मोठ्या स्टेशनवर विविध सोयीसुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना सालेकसासह इतर छोट्या स्थानकांना मात्र रेल्वे प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते.थांबा असणाऱ्या प्रत्येक एक्स्प्रेस आणि लोकल गाड्यांना येथून भरपूर प्रवासी मिळत असताना त्या प्रवाशांच्या गैरसोयींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हे रेल्वे स्टेशन समस्यांचे माहेरघर झाले आहे. सर्वसामान्य पुरूष प्रवाशांबरोबर महिला प्रवाशांना या रेल्वे स्टेशनवर अनेक गैरसोयीन्ाां नेहमी तोंड द्यावे लागते. त्यामुळे या रेल्वेस्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे ‘अच्छे दिन’ केव्हा येणार? असा प्रश्न तमाम रेल्वे प्रवाशांना पडला आहे.देशातील सर्वात जास्त व्यस्त असलेल्या रेल्वे मार्गापैकी एक असा मुंबई-हावडा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावरून कोलकाता ते मुंबई दरम्यान तसेच मधातील अनेक महत्वाच्या मोठ्या स्टेशनपर्यंत या मार्गावरून गाड्या धावतात. याशिवाय दिल्ली मार्गावर धावणाऱ्या व दक्षिण मार्गावर सुध्दा या मार्गावरून शेकडो गाड्यांची वर्दळ या मार्गावरून सुरू असते. सालेकसा रेल्वे स्टेशन वर २४ तासात सहा लोकल गाड्या तसेच दोन एक्सप्रेस गाड्या थांबतात. यात बिलासपूर ते अमृतसर नावाने धावणारी छत्तीसगड एक्सप्रेस दिल्ली मार्गावर कुठेही जाण्यासाठी उपयोगी गाडी आहे. तसेच हावडा-कुर्ला एक्सप्रेस ही मुंबईपर्यंत कुठेही जाण्यासाठी महत्वाची गाडी आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांसाठी येथे सालेकसा तालुक्यासह शेजारच्या मध्यप्रदेशचे प्रवासी सुध्दा येतात. लोकल गाड्यांमध्ये निम्या गाड्यांचा थांबा येथे रात्रीच्या वेळेतही असतो. एकंदरीत २४ तासातून १४-१५ वेळा या रेल्वे स्टेशनवरून प्रवासी बसतात आणि उतरतात. अशात प्रवाशांना रात्र झाली तर झोपण्याची सोय, शौचालयाची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय खाण्यापिण्याच्या वस्तुची सोय, एवढेच नाही तर नक्षलग्रस्त भाग असताना पोलिसांची सुरक्षा या महत्वाची सोयी अतिआवश्यक असतात. परंतु या रेल्वे स्टेशनवर यापैकी कोणतीही सोय व्यवस्थित नाही. त्यामुळे नेहमी या स्टेशनवरील प्रवाशांना विविध अडचणीना सामना करावा लागतो. नक्षलग्रस्त भागात असणाऱ्या या रेल्वे स्टेशनवर रात्रीला गाडीवरून उतरणारा प्रवाशी आपल्या घरापर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला रात्र या स्टेशनवरच काढावी लागते. परंतु या स्टेशनवर प्रवाशी निवांत झोप घेऊन रात्र काढणे अतिशय जिकरीचे आहे. सुरक्षित प्रतिक्षालय व झोपण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने येथे प्रवाशांना जागे राहूनच रात्र काढावी लागते. महिला प्रवाशांसाठी तर पूर्ण असुरक्षित असे हे स्थानक आहे. दार नसलेले एक छोटे प्रतीक्षालय असून येथे सर्वत्र नेहमी घाण पसरली असते. स्टेशन मास्तरने एक सफाईगार असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात स्वच्छतेचा अभाव दिसून आला. रात्रीला प्रवास करून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना या ठिकाणी असभ्य वागणूक मिळण्याची भिती नेहमी असते. अशात येथे रेल्वे सुरक्षाबल सुध्दा पुरविण्यात येत नाही. या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी एका ठिकाणी नळाची व्यवस्था आहे. परंतु तो नळ नेहमी नादुरूस्त असतो. त्यामुळे पिण्याचे पाणी या ठिकाणी उपलब्ध नसते. प्रवाशाना स्वत:च बाहेरून पाण्याची व्यवस्था करून घ्यावी लागते. आवश्यक झाल्यास स्टेशन बाहेर हॉटेलात जाऊन तहान भागवावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसात तरी प्रवाशांना थंड पाणी मिळावे अशी अपेक्षा असते. परंतू ती सोयसुद्धा नाही.
मोठे तुपाशी, छोटे स्टेशन उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2016 12:25 AM