विजेंद्र मेश्राम
खातिया (गोंदिया) : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, विमानांना उड्डाण घेण्यास अनुकूल वातावरण असल्याने या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी रायबरेलीचे पायलट प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू करण्यात आले आहे. मागील १४ वर्षांपासून हे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू असून, या विमानतळावरून आतापर्यंत ४५०हून अधिक पायलट तयार झाले आहेत.
तत्कालीन विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात हे विमानतळ तयार करण्यात आले. याठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी रायबरेलीचे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. येथे पायलट प्रशिक्षण केवळ हिवाळ्याच्या दिवसातच दिले जात होते. मात्र मागील दीड वर्षापासून वर्षभर शिकाऊ पायलटला प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या या प्रशिक्षण केंद्रात २५ मुले आणि २० मुली पायलट प्रशिक्षण घेत आहेत. मागील दीड वर्षात ९० पायलट तयार झाले आहेत. १४ वर्षांत अनेक पायलट या प्रशिक्षण केंद्राने दिले आहेत. पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यास सुद्धा मदत होत आहे.
अधिकाधिक उड्डाणे घेण्यास मदत
बिरसी विमानतळावर गेल्या दीड वर्षापासून इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीचे शिकाऊ पायलट प्रशिक्षण घेत आहेत. येथील हवामान अनुकूल असल्याने पायलटला अधिकाधिक उड्डाणे घेण्यास मदत होत आहे. त्यामुळे चांगले पायलट तयार होत असून, या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न आहे.
- कृष्णेंदू गुप्ता, संचालक, प्रशिक्षण केंद्र
हिवाळ्यात येतात सर्वाधिक शिकाऊ पायलट
थंडीच्या दिवसात इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी रायबरेलीचे शिकाऊ पायलट मोठ्या संख्येने येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. हिवाळ्यात रायबरेली येथे धुके खूप राहत असल्यामुळे उड्डाण प्रशिक्षण होत नाही. म्हणून शिकाऊ पायलट येथे येतात.
- कुंजल भट्ट, कप्तान (मुख्य उड्डाण प्रशिक्षक)
उड्डाण प्रशिक्षणासाठी बिरसी येथील वातावरण खूप अनुकूल आहे. त्यामुळे आता उड्डाण प्रशिक्षण वाढले आहे. मी आतापर्यंत १३० तासांचे उड्डाण पूर्ण केले आहे.
- अनमता अन्सारी, प्रशिक्षित पायलट