लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव मतदारसंघात काँग्रेसचे माजी आ.रामरतन राऊत यांनी बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार अशी तिहेरी काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. तिन्ही उमेदवार सक्षम असल्याने मतांच्या विभाजनात सर्वाधिक मते घेण्यात कोण यशस्वी होतो, तोच या मतदारसंघाचा सिकंदर म्हणजे आमदार होईल.आमगाव मतदारसंघाचा इतिहास पाहता महादेवराव शिवणकर वगळता कुणालाच सलग निवडून येता आले नाही. तर या मतदारसंघातील मतदारांनी सुध्दा दरवेळी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार तोच फार्मुला कायम ठेवतात की जुने ते सोने म्हणून पुन्हा संधी देतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने या क्षेत्राचे विद्यमान आ. संजय पुराम यांना संधी दिली तर काँग्रेसने मागील दहा वर्षांपासून या मतदारसंघात सक्रीय असलेले सहषराम कोरोटे यांना संधी दिली.काँग्रेसने उमेदवारी देताना ऐनवेळी माजी आ.रामरतन राऊत यांना डावलले त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने सुभाष रामरामे यांना आणि बसपाने अमर पंधरे यांना संधी दिली. एकूण नऊ उमेदवार जरी या मतदारसंघात निवडणूक रिंगणात असले तरी थेट सामना हा भाजपचे संजय पुराम आणि काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांच्यात होणार आहे.अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेले रामरतन राऊत नेमकी किती मते घेण्यात यशस्वी होतात, यावर या दोन उमेदवारांमधील विजयाचे समीकरण ठरणार आहे. राऊत यांनी घेतलेल्या मतांचा फटका काँग्रेस आणि भाजपला सुध्दा बसू शकतो. मात्र काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी या मतदारसंघात मागील दहा वर्षांपासून बांधनी केली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून सुध्दा नशीब आजमाविले आहे. त्यामुळे मतांचे विभाजन कसे होऊ शकते याचा त्यांना चांगला अभ्यास आहे. त्याच दृष्टीने त्यांनी प्रचाराला सुरूवात केली. यात ते यशस्वी झाल्यास त्यांना विजयाचा पल्ला गाठणे शक्य होईल. तर भाजपचे उमेदवार संजय पुराम हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून त्यांनी मागील पाच वर्षांत केलेली कामे आणि पक्षाने दुसऱ्यांदा दिलेली संधी त्यांच्यासाठी प्लस पार्इंट ठरू शकते. मात्र त्यांनी पाच वर्ष पक्ष संघटनाकडे लक्ष न दिल्याने काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यांची नाराजी दूर करण्यात पुराम यांना यश न आल्यास त्यांना सुध्दा विजयासाठी ‘यह राह नही आसान’अशीच स्थिती निर्माण होऊ शकते.या मतदारसंघात एकूण २ लाख ६६ हजार ५३० मतदार असून हे क्षेत्र आदिवासी बहुल आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि बसपाचे उमेदवार किती मते मिळविण्यात यशस्वीव होतात, अपक्ष उमेदवार किती टक्के मतांचे विभाजन करतो, यावरच विजयाचे अंतीम समीकरण ठरण्याची शक्यता आहे.अपक्ष उमेदवारांनी २० हजारावर मते घेतल्यास भाजपच्या उमेदवारासाठी ती अनुकुल बाब ठरुन काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरु शकते.दुर्गम भागातील मतांवर नजरआमगाव विधानसभा मतदारसंघ हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या अधिक आहे. मतदारसंघातील अनेक गावांमध्ये अद्याप पायाभूत सुविधा उपलब्ध नाही.त्यामुळे तिथपर्यंत पोहचून या मतदारांचे मन वळविण्यात जो यशस्वी होईल, त्याला विजयाचा पल्ला गाठण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच सर्वांचे लक्ष दुर्गम भागातील मतदारांवर असणार आहे.
बंडखोरीमुळे तिहेरी लढतीत काट्याची टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:00 AM
काँग्रेसने उमेदवारी देताना ऐनवेळी माजी आ.रामरतन राऊत यांना डावलले त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने सुभाष रामरामे यांना आणि बसपाने अमर पंधरे यांना संधी दिली. एकूण नऊ उमेदवार जरी या मतदारसंघात निवडणूक रिंगणात असले तरी थेट सामना हा भाजपचे संजय पुराम आणि काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांच्यात होणार आहे.
ठळक मुद्देमतविभाजनाचा बसू शकतो फटका : कोरोटे-पुराम यांच्यात रंगणार सामना