गोंदिया : महाड येथे चवदार तळ्याजवळ मनुस्मृती दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या कथित आरोपावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात येथे ३० मे रोजी भाजपने निषेध व्यक्त केला. तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आव्हाडांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारुन संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या आंदोलनावरुन सध्या राजकारण तापले आहे. याविरुध्द भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून याचे पडसाद गोंदियात उमटले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुवारी (दि.३०) दुपारी १२ वाजता भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत डोंगरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी संजय कुलकर्णी, अमित झा, सुनील केलनका, धर्मिष्टा सेंगर, मिलिंद बागडे, सुनील तिवारी, राकेश अग्रवाल, मनोज पटनायक, नरेंद्र तुरकर, जे.डी.जगणीत, श्रीकांत चांदूरकर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.