गोंदिया - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे हे निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी (दि. ५) रात्री ८:४५ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करड येथे गेले होते. मात्र येथील गावकऱ्यांनी १२ तास वीज पुरवठा का नाही? या प्रश्नावरून संताप व्यक्त केला. त्यामुळे सुनील मेंढे यांना प्रचारसभा न घेताच परत जाण्याची वेळ आली. या प्रकारामुळे काहीकाळ बोळदे करड येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाेळदे करड, झरपडा, ताडगाव, धाबेटेकडी आदर्श या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये विजेच्या कमी पुरवठ्यामुळे असंतोष आहे. तीन चार वर्षापूर्वी सिंचन व विजेच्या प्रश्नासाठी याच परिसरातील शेतकऱ्यांनी कालव्यात आंदोलन केले होते. कृषीपंपांना वीज मिळत नाही. शेतीला सिंचन होत नव्हते. रात्री बेरात्री शेतात जाऊन शेतात पिकांचे संरक्षण करणे देखील कठीण झाले. या मुद्द्यांवर परिसरातील शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये रोष आहे.
शुक्रवारी (दि.५) रात्री ८:४५ वाजताच्या सुमारास महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, हे आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी मंत्री राजकुमार बडोले व पदाधिकाऱ्यांसह बोळदे करड येथे नियोजित प्रचारसभेसाठी गेले होते. सभेला सुरुवात करताच येथील गावकऱ्यांनी भाषणबाजी बंद करा आदी १२ तास विजेच्या प्रश्नावर बोला, सिंचनाचा प्रश्न केव्हा मार्गी लावणार, असे प्रश्न उपस्थित करीत रोष व्यक्त केला. दरम्यान, सुनील मेंढे व त्यांच्यासह असलेल्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण गावकरी काहीही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. गावकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रचारसभा न घेताच उमेदवार व त्यांच्यासह गेलेल्या पदाधिकाऱ्यांना परत जावे लागले.
शुक्रवारी बाेळदे करड येथे प्रचारसभेसाठी गेलो असता सभेला सुरुवात झाल्यानंतर काही गावकऱ्यांनी विजेच्या प्रश्नाला घेवून गोंधळ घातला. तसेच भाषण देऊन नका आधी विजेच्या प्रश्नावर बोला असा मुद्या लावून धरला. यानंतरही आपण गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच चर्चा करुन या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले पण ते काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. - सुनील मेंढे, उमेदवार भाजप