लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील भुयारी गटार योजनेला घेऊन भारतीय जनता पक्षात पडलेल्या फूट प्रकरणाची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष व सर्व नगर परिषद सदस्यांना गुरूवारी (दि.३०) नागपूर येथे बोलाविण्यात आले आहे. या बैठकीत विरोधात गेलेल्या १३ नगरसेवकांना भुयारी गटार योजनेला केलेल्या विरोधावर स्पष्टीकरण द्यावे लागणार असल्याची माहिती आहे.भुयारी गटार योजनेचा विषय नगर परिषदेत चांगलाच गाजत होता. या योजनेला मंजुरी देण्यात यावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य वरिष्ठ नेत्यांचा आग्रह होता. मात्र सोमवारी (दि.२७) झालेल्या नगर परिषदेच्या विशेष सभेत सत्तेतील भारतीय जनता पक्षाच्याच १३ नगरसेवकांनी बंड पुकारून विरोधाची भुमिका घेत सभा त्याग केला. याच विषयाला घेऊन गुरूवारी (दि.३०) भारतीय जनता पक्षाच्या नागपूर येथील विदर्भ विभागीय कार्यालयात येथील सर्व नगरसेवक व नगराध्यक्षांना बोलाविण्यात आले आहे.या बैठकीत विरोधात गेलेल्या १३ नगरसेवकांना त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तर या नगरसेवकांंवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली जाण्याची शक्यता आहे. तर विरोधात गेलेल्या नगरसेवकांनी सुध्दा बैठकीला जाण्यापूर्वी तयारी केली असल्याची माहिती आहे. या नगरसेवकांनी नगर परिषदेत त्यांच्या होत असलेल्या उपक्षेबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली. मात्र याची अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याची माहिती आहे. दरम्यान या बैठकीत त्यांना त्यांची भुमिका स्पष्ट करण्याची संधी मिळाली असल्याने ते बैठकीत सर्व उणे दुणे काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विशेष म्हणजे पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहे. तर नुकत्याच झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे नगर परिषदेत बंड निर्माण झाला तर त्याचा परिणामी आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते सुध्दा ही जोखीम स्विकारायला तयार नसून यावर वेळीच मलमपट्टी करुन हा वाद शमविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गुरूवारी होणाऱ्या बैठकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भाजप नगरसेवकांना द्यावे लागणार स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:59 AM
शहरातील भुयारी गटार योजनेला घेऊन भारतीय जनता पक्षात पडलेल्या फूट प्रकरणाची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतली आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष व सर्व नगर परिषद सदस्यांना गुरूवारी (दि.३०) नागपूर येथे बोलाविण्यात आले आहे.
ठळक मुद्देनागपूर येथे आज बैठक : सर्व नगरसेवक व नगराध्यक्षांना बोलाविले, बैठकीकडे सर्वांचे लक्ष