गोंदिया : जिल्ह्यातील एकूण १८९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला निवडणूक पार पडली. तर ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. शुक्रवारी (दि.१२) जिल्ह्यातील १७५ ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली आहे. यात गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सालेकसा या चार तालुक्यातील एकूण ५० ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व स्थापन केले. तर उर्वरित चार तालुक्यातील ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही.
राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीतील उत्साह थोडा कमी झाला होता. १५ जानेवारीला ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर २८ जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर सरपंचपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. शुक्रवारी जिल्ह्यातील १७५ ग्रामपंचायतींच्या सरपंच,उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात चार तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व स्थापन केले. यात सालेकसा तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतींवर भाजप, तर चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व स्थापन केले. गोरेगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींवर भाजप, ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेस, ६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व स्थापन केले आहे. तिरोडा तालुक्यातील एकूण १९ ग्रामपंचायतींपैकी भाजप १३, शिवसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस २, काँग्रेस १ तर ग्रामपंचायतीवर अपक्षांनी सत्ता स्थापन केली आहे. तर देवरी, सडक अर्जुनी या तालुक्यातील ग्रामपंचायतींवर नेमके वर्चस्व कुणाचे याचे चित्र स्पष्ट झाले नव्हते. या तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापन केल्याचा दावा केला. जिल्ह्यात ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठेही अनुचित घटना किंवा गोंधळ झाल्याची माहिती नाही.
........
विजयी जल्लोष
शुक्रवारी जिल्ह्यातील १७५ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरंपच निवडीची प्रक्रिया पार पडली. सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर विजयी जल्लोष करण्यात आला. यावेळी राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
......
अर्जुनी मोरगाव राष्ट्रवादी- काँग्रेसचे वर्चस्व
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. पण राजोली ग्रामपंचायतची निवडणूक मतदारांनी बहिष्कार घातल्यामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे २८ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यात शुक्रवारी सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात भाजप १०, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस १५ आणि ३ ग्रामपंचायतींमध्ये समीश्र चित्र होते.
........
आमगाव तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सरशी
आमगाव तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपने ८ ग्रामपंचायतींवर, काँग्रेसने ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ९ ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापन केले तर शिवसेनेने १ ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापन केले.
कोट :
गोंदिया तालुक्यातील २९ पैकी २० ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व स्थापन करण्यात यश आले असून हे सर्व यश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी दिलेला कल पाहता मतदारांनी पुन्हा एकदा विकास कामांवर विश्वास व्यक्त केला.
-गोपालदास अग्रवाल, माजी आमदार.
.....
तिरोडा विधानसभा क्षेत्रातील एकूण ४२ ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश आले आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी पुन्हा एकदा विकासात्मक कामे आणि कुशल नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. हे सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे.
- विजय रहांगडाले, आमदार
.......
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चांगले प्रदर्शन केले आहे. आठही तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन केली आहे. ग्रामपंचायतींचे बळकटीकरण करुन विकास कामांना चालना देण्यात येईल.
- राजेंद्र जैन, माजी आमदार
.......
शुक्रवारी पार पडलेल्या सरपंच,उपसरपंच निवडणुकीत काँग्रेसने देवरी, सालेकसा, गोरेगाव तालुुक्यात चांगले यश प्राप्त केले आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विकासाला कशी चालना देता येईल यासाठी प्रयत्न केले जाईल.
- डाॅ.नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.