इसापूर : अर्जुनीमोर तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकविला आहे. सरपंचपदी कल्पना शिवकुमार करंबे तर उपसरपंच पदावर दिलीप नामदेव सोनवणे विराजमान झाले आहेत. या सरपंच व उपसरपंच निवडीत इसापूर गावात काही वेळ तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
विशेष म्हणजे भाजप समर्थित तीन उमेदवार निवडून आले होते. तर गाव विकास पॅनल समर्थित तीन उमेदवार निवडून आले होते. गजानन चांदेवार यांच्या गटाची एक महिला उमेदवार निवडून आली होती. त्यामुळे एकमेव निवडून आलेल्या सदस्य कल्पना करंबे यांची भूमिका निर्णायक होती. गजानन चांदेवार हे भाजपा समर्थक असल्याने करंबे यांना सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून सरपंचपदी आरूढ करण्यासाठी भाजपच्या तीन उमेदवारांनी मतदान केले. कल्पना करंबे यांना चार मते मिळाली तर गाव विकास पॅनलच्या दीक्षा लांजेवार यांना तीन मते मिळाली. तर उपसरपंच पदासाठी गाव विकास पॅनलने दिलीप सोनवणे यांचे नामनिर्देशन पत्र उपसरपंच पदासाठी दाखल केले होते. भाजप समर्थित दिलीप सोनवणे यांना आपल्या गटात आणण्यासाठी विकास पॅनलने आटोकाट प्रयत्न करूनही दिलीप सोनवणे यांनी भाजपा समर्थित उमेदवार कल्पना करंबे यांना मतदान केले तर उपसरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन असलेले दिलीप सोनवणे यांना बिनविरोध उपसरपंच पदावर विजयी घोषित करण्यात आले. अध्यासी अधिकारी म्हणून तलाठी एम.एच.टेंबरे यांनी काम पाहिले. तलाठी निमकर ग्रामसेवक विनोद एस.श्रीवास्तव उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक विनोद श्रीवास्तव यांनी विजयी सरपंच कल्पना करंबे व उपसरपंच दिलीप सोनवणे व इतर ग्रामपंचायत सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.