भाजपने देशाला तीन 'चि' दिले, नाना पटोलेंची भाजपावर जबरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 09:11 PM2021-06-06T21:11:09+5:302021-06-06T21:11:53+5:30
नाना पटोले यांची भाजपवर टिका : भाजपमुळे देशाचे वाटोळे झाले
गोंदिया : जनतेशी खोटे बोलून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारमुळे देशाचे वाटोळे झाले आहे. मागील सात वर्षांपासून देशाच्या विकासाला सुध्दा उतरती कळा लागली आहे. भाजप सरकारने देशाला चिनचे वाढते वर्चस्व, कोरोनामुळे वाढलेले मृत्यूचे प्रमाण आणि त्यामुळे जळणाऱ्या चिता आणि यातून आलेल्या संकटामुळे देशवासीयांची वाढविली चिंता असे तीन 'चि' देशाला दिल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि.६) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक शहीद भोला भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. तसेच गोंदिया येथूनच त्यांनी महाराष्ट्राच्या दाैऱ्याची सुरुवात केली. पटोले म्हणाले, भाजप सरकारने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला देखील त्यांचे काम करु देत नसृून त्यात वांरवार अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ओबीसी, मागासवर्गीय, मराठा, धनगर आदी समाजामध्ये तेढ निर्माण करुन महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठा समाजाचे आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकरचेच धोरण जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यामुळे या सरकारचा खरा चेहरा जनतेपुढे आणण्यासाठी व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मी महाराष्ट्राचा दौरा करीत असल्याचे पटोले यांनी सांगितले. देशावर कोरोनाचे संकट हे केंद्र सरकारच्या दुर्लक्षीत धोरणामुळेच आले. जागतिक आरोग्य संघटनेने देशात कोरोनाची दुसरी लाट येणार असा इशारा दिला होता. तसेच त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष करुन जनतेला गाफिल ठेवण्याचे काम केले त्यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली.
हजारो लोक मृत्यूमुखी पडल्याचा आरोप पटोले यांनी केला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचेे सरसंघचालक मोहन भागवत हे आरक्षण सपविण्याची भाषा करीत आहेत. तर पंतप्रधान हे संघाचे स्वंयसेवक आहेत मग आरक्षणाच्या बाजुने कोण आहेत आणि विरोधात कोण हे जनतेनेच ठरवावे. तसेच देशातील जनता भाजपला निश्चितच धडा शिकवेल, जी स्थिती भाजपची पश्चिम बंगालमध्ये तिच आता सर्वत्र होईल अशी टिका सुध्दा पटोले यांनी केली. पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे, आ. अभिजीत वंजारी, सहषराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष नामदेव किरसान, जिल्हा कार्याध्यक्ष रत्नदीप दहीवले, अमर वऱ्हाडे उपस्थित होते.
विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका सुध्दा स्वबळावर लढेल. त्या दृष्टीने पक्षाने तयारी सुध्दा केली आहे. या निवडणुका स्वबळावरच असा पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा देखील सूर आहे. त्यामुळेच या निवडणुका स्वबळावर लढल्या जातील असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
एमबीबीएसच्या परीक्षा पुढे ढकला
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे अशात १० जूनला एमबीबीएसच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण वाढली असून या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा करुन या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तसेच कोरोना बाधित विद्यार्थ्यांना याच सत्रात काही दिवसांनी परीक्षा देण्याची मागणी केली असल्याचे पटोले यांनी सांगितले.