देवरी : भारतीय जनता पक्ष हा मोठ्या व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा पक्ष नसून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनीही भाजप पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवायला नेहमी प्रयत्नशील राहिजे पाहिजे. नागरिकांची कामे कार्यकर्त्यांनी सतत करावीत. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनीच नेल्या पाहिजेत. प्रत्येक बुथ हे लोकांचे प्रश्न सोडविण्याचे केंद्र व्हावे. तरच आपल्याला बुथ जिंकता येईल, असे भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी सांगितले.
देवरी तालुक्यात सिंदीबीरी येथे भारतीय जनता पक्ष देवरी मंडलाच्या प्रमुख कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, माजी आमदार संजय पुराम, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, जिल्हा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, जिल्हा उपाध्यक्ष झामसिंग येरणे, सविता पुराम, कौशल्या कुंभरे, आफताब शेख, श्रीकृष्ण हुकरे, सुकचंद राऊत मंचावर उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी मोदींनी सात वर्षांच्या काळात १३६ योजना राबविल्याचे सांगितले. तर माजी आमदार संजय पुराम यांनी देवरी तालुक्यात १०७ बुथ तयार झाले असून, एक बुथ ३० कार्यकर्ता अशी कमिटी तयार करण्यात आल्याचे सांगून कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अनिल येरणे यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण सोनसर्वे यांनी केले. प्रवीण दहीकर यांनी आभार मानले. प्रमोद संगीडवार व यादोराव पंचमवार यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.