लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बाहुबली या हिंदी चित्रपटातील बाहुबलीने कट्टपा को क्यू मारा, हा विषय तेव्हा खूप चर्चेचा झाला होता. यावरून बरेच विनोददेखील निर्माण झाले होते. असेच चित्र सध्या गोंदिया जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी दोन अपक्ष सदस्यांना घेऊन भाजपला बहुमताने सत्ता स्थापन करणे सहज शक्य होते. मग, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत का घेतले, या प्रश्नाने सध्या भाजप नेत्यांना बेजार केले आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते तसेच कुणीच कुणाचा वैरी नसतो, हेदेखील बरेचदा सिद्ध झाले आहे. सत्तेच्या समीकरणासाठी राजकारणी वेळेवर कसलीही तडजोड करू शकतात. याचाच परिचय मंगळवारी जिल्हावासीयांना जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेप्रसंगी आला. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज होती. भाजपचे २६ सदस्य होते, दोन अपक्ष सदस्य भाजपसोबत आल्याने त्यांना जि.प.मध्ये सहज सत्ता स्थापन करणे शक्य होते. पण, यानंतरही वेळेवर कोणता धोका नको म्हणून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि चाबी संघटनेच्या चार सदस्यांना सोबत घेतले. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी संघटना आणि अपक्ष मिळून हा आकडा ४० वर पोहोचला. एकीकडे भाजप नेते सोमवारी रात्रभर सत्तेचे समीकरण जुळवत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीलासुद्धा सोबत घेत असल्याची माहिती कुणालाच नव्हती. मंगळवारी सकाळी अध्यक्षपदासाठी भाजपचे पंकज रहांगडाले आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर यांनी नामाकंन दाखल केल्यावर भाजप व राष्ट्रवादीच्या युतीचे पिक्चर पुढे आले. या युतीची माहिती भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बऱ्याच वरिष्ठ नेत्यांनासुद्धा नव्हती. अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड झाल्यानंतर अनेकांच्या मुखात केवळ एकच प्रश्न होता, तो म्हणजे भाजपकडे अपक्षांना घेऊन बहुमत होत असतानाही मग राष्ट्रवादी काँग्रेसह युती का, हाच प्रश्न होता. तर, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातसुद्धा सध्या हाच विषय चर्चेचा आहे.
...तर चित्र असते वेगळे जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या मर्जीतील असावा, याला घेऊन भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला होता. त्यातच एका नेत्याने आठ सदस्यांना घेऊन वेळेवर वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केल्याची कुजबुज होती. त्यामुळे तसे झाल्यास भाजपला सर्वात मोठा पक्ष असूनही जि.प.मध्ये सत्तेबाहेर राहावे लागले असते. हा धाेका निर्माण होऊ नये, यासाठीच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि चाबीच्या सदस्यांना सोबत घेतल्याचे बोलले जाते.
या युतीला काय नाव देणार ?जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने यापूर्वी जिल्हा परिषदेत काँग्रेसने युतीधर्म नाकारत राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला सारून भाजपसोबत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अभद्र युती केल्याचा आरोप काँग्रेसवर केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसदेखील भाजपसोबत गेला. त्यामुळे आता ही युती भद्र की अभद्र अशी टीका होत आहे. भाजपसोबत जाण्याचे पाऊल का?जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच पाण्यात पाहण्याचे काम केले. मागील जि.प. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतानासुद्धा केवळ बंगाल आणि गल्लीच्या वादात काँग्रेसने राष्ट्रवादीसह सत्ता स्थापन न करता भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती. तर हेच चित्र पंचायत समित्यांमध्येसुद्धा पाहायला मिळाले. तर, काँग्रेसने भंडाऱ्यात भाजपसोबत जाण्याची खेळी खेळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने वेळेवर धोका नको म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.