गोंदिया : आधी घोटाळेबाज म्हणून आरोप करायचे, नंतर त्यांची चारही बाजूने कोंडी करायची, ईडी, सीबीआयची भीती दाखवायची आणि त्यांचा भाजपामध्ये प्रवेश करून घ्यायचा असेच धोरण आहे. भाजपा हा घोटाळेबाजांच्या घोटाळ्यांवर पांघरूण घालणार पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी (दि.१३) गोंदिया येथे आयोजित काँग्रेसच्या मेळाव्यात केला.
महाराष्ट्रातील भाजपचे सरकार हे घोटाळेबाज सरकार असून या सरकारचा खरा चेहरा उघड करण्याचे काम आम्ही नक्कीच करू असे सांगितले. देशाचे पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या घरी गणेश पूजेसाठी जातात हे तुम्हाला पटते का? असे आजवरच्या पंतप्रधानांनी केलेले आहे का? पंतप्रधानांच्या या कृतीने न्यायालयाची प्रतिमा मलिन झाली नाही का असा सवाल महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला. संविधान संपविण्याचा नेमका प्रयत्न कुणाकडून होत आहे हेदेखील यामुळे पुढे आल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात कुठेलच मतभेद नसून राज्यातील सर्व काँग्रेस नेते एकत्रित असल्याचा संदेश आजच्या मेळाव्यातून दिला असल्याचे सांगितले. ही दोन विचारांची लढाई आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनो भाजपा आणि संघाला घाबरू नका पुढे जा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवून त्यांची जागा दाखवा दाखवून द्या असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
भाजपा कधीच कुणाचा होऊ शकत नाही
भाजपाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. याचा अनुभव आधी मी आणि नंतर माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी घेतला आहे. ते आणि मी वेळीच सद्बुद्धी सुचल्याने या पक्षातून बाहेर पडलो. हा पक्ष कधीच महिला, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा होऊच शकत नाही. भाजपाचे धोरण देशाला बरबाद करण्याचे असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कमिशन खाणाऱ्यांना धडा शिकविणारमालवण येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी २३६ कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी या बांधकामावर दोन कोटी रुपये खर्च केल्याने अल्पावधीतच हा पुतळा पडला. यात कमिशन खाणाऱ्यांना धडा शिकविणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिला.