आमगाव : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा भारतीय जनता पक्ष आमगावतर्फे निषेध करण्यात आला. बुधवारी आमगाव येथील मानकर चौकात तृणमूल काँग्रेसच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करण्यात आली. राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष केशव मानकर, भेरसिंह नागपुरे, महामंत्री नरेंद्र भाजपेई, राजू पटले, राकेश शेंडे, पिंटू अग्रवाल, हरिहर मानकर, कृष्णा चुटे, ललित मानकर, सुनील पडोळे, निमेश दमाहे, मनोज सोमवंशी, कमलेश चूटे, संतोष बघेले, बाळू भुजाळे यांनी केले.