गोंदिया : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारने खोटे आरोप लावून भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपतर्फे काळ्या फिती लावून व महाविकास आघाडी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा दहन करून तीव्र आंदोलन करण्यात आले.
केवळ दुष्ट हेतूने केलेली १२ आमदारांची निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेस तोंड देण्याची हिंमत सरकारने दाखवावी, अशी मागणी या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गमावले असून, हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भारतीय जनता पक्ष राज्यात संघर्ष करीतच राहील, असा इशारा याप्रसंगी बोलताना माजी आमदार कुथे यांनी दिला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या आक्रमकपणाला तोंड देण्याची हिंमत महावसुली सरकारमध्ये नसल्यामुळेच दडपशाही करून सभागृहात ओबीसी आरक्षणाचा आवाज दाबण्याकरिता सरकारने १२ आमदारांचे केलेले निलंबन म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असे ते म्हणाले. ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नाही, तर केवळ वेळकाढूपणा करून ओबीसी समाजाची फसवणूक करावयाची असल्याचा आरोप कुथे यांनी केला. शिष्टमंडळात माजी आमदार रमेश कुथे, जिल्हा महामंत्री (संघटन) संजय कुलकर्णी, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, न. प. सभापती बंटी पंचबुद्धे, प्रकाश रहमतकर, ऋषिकांत साहू, अशोक हरिणखेडे, गजेंद्र फुंडे, गुड्डू कारडा, मनोज मेंढे, अर्जुन नागपुरे, बाबा बिसेन, शंभूशरण सिंग ठाकूर, वजीर बिसेन, धर्मेंद्र डोहरे, नेत्रदीप गावंडे, पुरुषोत्तम ठाकरे, टिंगू अग्रवाल, सुशील राऊत, राजेश बिसेन, टेकचंद रहिले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.