लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी आरोप करीत त्यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. या लेटरबाॅम्बनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणावर महाराष्ट्र सरकार पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करीत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. तसेच या विरोधात रविवारी सकाळी शहरातील जयस्तंभ चाैकात निदर्शने करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचारी असे विविध नारे लावत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. गोंदिया शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महात्मा गांधी चौकात पोहचला. या चौकात निदर्शने करून मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चा सुरू झाला त्यावेळी शहर पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला होता. यावर पत्रकारांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी याला दुजोरा देताना सांगितले की भाजपच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी माेर्चा अडविला होता. कोविडची साथ सुरू असल्यामुळे माेर्चा काढू नये असे पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले. परंतु यात चर्चा करून मार्ग काढण्यात आल्याचे सांगितले. या मोर्चात माजी आमदार गोपालदास अग्रवाल, नगरसेवक राजकुमार कुथे, संजय कुळकर्णी, धनलाल ठाकरे व इतरांचा समावेश होता.