नगराध्यक्षपदावर मोहोर : गोंदियात अशोक इंगळे तर तिरोड्यात सोनाली देशपांडे विजयी गोंदिया : गोंदिया आणि तिरोडा या दोन्ही नगर परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह देत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळविला. गोंदियात माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी राष्ट्रवादीचे अशोक उर्फ गप्पू गुप्ता यांचा ५९४९ मतांनी पराभव केला. तिरोड्यात भाजपच्या सोनाली देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ममता आनंद बैस यांच्यावर अवघ्या ९५ मतांनी मात करून विजयश्री खेचून आणली. गोंदियात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या रणसंग्रामात नगराध्यक्षपद कोणाच्या ताब्यात जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे तीनही मुख्य पक्षांसह बसपाचा हत्ती कोणाचे गणित बिघडविणार याचीही चर्चा होती. अखेर गोंदियात भाजपने बाजी मारली. तिरोड्यात नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे उमेदवार जास्त असतानाही नगराध्यक्षपद पदरात पाडून घेण्यात भाजपने यश मिळविले. त्यामुळे आ.विजय रहांगडाले यांची खेळी त्या ठिकाणी यशस्वी झाली आहे. गोंदियात अशोक इंगळे यांना २४ हजार ५०० मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक गुप्ता यांना १८ हजार ५५१ मते मिळाली. काँग्रेसचे राकेश ठाकूर यांना १२ हजार ५५३ मते मिळाली. तिरोड्यात दुहेरी लढतीत भाजपच्या सोनाली देशपांडे यांना ५,९८७ मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी ममता आनंद बैस यांना ५ हजार ८९२ मते मिळाली. बसपाच्या पौर्णिमा मेश्राम यांनी १३५८ मते घेत तिसरे स्थान पटकावले. सकाळी १० वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतनच्या सभागृहात मतमोजणीला सुरूवात झाली. यावेळी फुलचूल नाक्यापासूनच पुढे वाहतूक बंद करण्यात आली होती. मतमोजणीदरम्यान कोणतीही गडबड झाली नाही. चोख बंदोबस्तात दुपारी ३.३० वाजेपर्यंत मतमोजणीचे काम सुरू होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसीलदार हिंगे, अपर तहसीलदार मेश्राम यांनी निकाल देण्याची जबाबदारी पार पाडली. जिल्हाधिकारी काळे, पो.अधीक्षक दिलीप पाटील यांनीही देखरेख ठेवली. पालकमंत्र्यांच्या कार्यालयात विजयी जल्लोष ४गोंदिया : नगर परिषदेच्या निवडणूक भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या भरघोस यशाचा जल्लोष पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते व त्यांच्याच सोबत विजय मिरवणूक काढण्यात आली. भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवित नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्यासह १८ सदस्यांना निवडून दिले. यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. हा आनंद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री बडोले यांच्या फुलचूर नाक्यावरील येथील जनसंपर्क कार्यालयात साजरा केला. पालकमंत्र्यांच्या कार्यालयात इंगळे यांच्यासह निवडून आलेले सदस्य एकत्र आले. तेथे निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. पश्चात पालकमंत्री बडोले, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आमदार खोमेश रहांगडाले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले शहर अध्यक्ष सुनिल केलनका व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विजय मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी डीजेच्या तालावर थिरकत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. फुलचूूर नाका येथून निघालेली ही मिरवणूक मुख्य बाजार भाग होत निघाली होती. राष्ट्रवादीच्या विजयी रॅलीवर दगडफेक ४ गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधून विजयी झालेले विजय गणपत रगडे नागरिकांना अभिवादन करण्यासाठी गौतम नगराच्या मदिना मस्जिदच्या मागील रस्त्याने जात असताना त्यांच्या रॅलीवर पराभूत झालेल्या उमेदवारासह ३५ लोकांनी दगडफेक केली. यात नगरसेवक विजय गणपत रगडे, त्यांचे भाऊ रंजीत गणेश रगडे (४२) सावराटोली व इतर कार्यकर्ते जखमी झाले. विजय रगडे यांनी काँग्रेसचे उमेदवार अफजल हुसैन शाह ऊर्फ छन्नुभाई यांचा पराभव केल्यामुळे छन्नुभाई व त्याच्या कार्यकत्यानी त्यांच्या विजयी रॅलीवर विटा, दगड, भांडी फेकून मारहाण केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रगडे यांना जातीवाचक शिवीगाळही केल्याचे म्हणणे आहे. या घटनेनंतर गोंदिया शहरात तणाव निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांनी आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद केली. विजय रगडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार नोंदविली. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तिरोडा नगराध्यक्षपदाचे टॉप-४ उमेदवार नगराध्यक्ष- सोनाली देशपांडे (विजयी- भाजप)- ५,९८७ ममता आनंद बैस (राष्ट्रवादी) - ५,८९२ पौर्णिमा मेश्राम (बसपा)- १३५८ ममता लक्ष्मीनारायण दुबे (काँग्रेस)- १०७१ ९५ मतांनी सोनाली देशपांडे विजयी गोंदिया नगराध्यक्षपदाचे टॉप-४ उमेदवार नगराध्यक्ष- अशोक इंगळे (भाजप)- २४,५०० अशोक गुप्ता (राष्ट्रवादी)- १८,५५१ राकेश ठाकूर (काँग्रेस)- १२,५५३ पंकज यादव (बसपा)- ९२६९ दुर्गेश रहांगडाले (शिवसेना)- ३३२२ ५९४९ मतांनी इंगळे विजयी तिरोडा नगर परिषदेतील बलाबल वर्ष २०१७ २०१२ राष्ट्रवादी काँग्रेस ९ १५ भाजप ५ १ शिवसेना २ ० काँग्रेस ० १ अपक्ष १ ० एकूण नगरसेवक १७ १७ गोंदिया नगर परिषदेतील बलाबल वर्ष २०१७ २०१२ भाजप १८ १६ राष्ट्रवादी काँग्रेस- ७ ११ काँग्रेस ९ ८ बसपा ५ ० शिवसेना २ ३ अपक्ष १ २ एकूण नगरसेवक ४२ ४०
गोंदिया-तिरोड्यात भाजपचा झेंडा
By admin | Published: January 10, 2017 12:13 AM