गोंदिया : आदिवासी विविध कार्यकारी संस्था गोठणगावच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपच्याच दोन गटात झालेल्या लढतीत भोजराज पाटील लोगडे यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनलने बाजी मारली. भाजपच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि परिसरातील शेतकरी, शेतमजुरांचा या विजयात सिंहाचा वाटा असल्याचे पॅनलचे मार्गदर्शक माजी सरपंच परसरामजी हटवार यांनी सांगितले. ३१ जुलै रोजी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपच्या शेतकरी परिवर्तन पॅनलचे सात उमेदवार तर शेतकरी विकास आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले. एकूण १३ जागांसाठी ही निवडणूक झाली. पुढील पाच वर्षाकरिता हे संचालक कार्यरत राहणार आहेत. पहिल्यांदाच भाजपाच्या दोन गटामध्ये निवडणूक लढविण्यात आली. त्यात परसराम हटवार यांच्या मार्गदर्शनात शेतकरी परिवर्तन पॅनलचे भोजराज लोगडे, श्रीराम उईके, सिगू कोवे, कुसृूम परतेकी, सत्यकला वाढवे, देवराम हलमारे, दिगंबर कराडे तर शेतकरी विकास आघाडीचे मनीराम कुंभरे, हरिश्चंद्र देव्हारी, नवाजी राणे, गोपीनाथ दरवडे, जयदेव मेश्राम हे उमेदवार निवडून आले. आता अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे संस्थेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे. संस्थेचे अध्यक्षपद आदिवासी समाजातील संचालकाकडे राहणार आहे. निवडून आलेले आदिवासी गटाचे उमेदवार एका पॅनलकडे चार तर दुसऱ्या पॅनलकडे तीन असे एकूण सात उमेदवार आहेत. त्यापैकी अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विजयी संचालकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक असल्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहे. परंतू मी भाजपसाठी निष्ठेने काम करीत आलो आहे त्यामुळेच हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया भोजराजजी लोगडे यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)
आदिवासी सेवा संस्थेच्या निवडणुकीत भाजपची बाजी
By admin | Published: August 03, 2016 12:35 AM