गोंदिया : मागील खरीप हंगामातील धानाची उचल करुन भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करण्यात आला आहे. पण राईस मिलर्सकडून धानाची उचल करण्यास विलंब केला जात असल्याने रब्बी हंगामातील धान खरेदी अडचणीत आली आहे. त्यामुळे धानाची भरडाईसाठी उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याच्या सूृचना खा. सुनील मेंढे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केल्या.
जिल्ह्यातील विविध विषयांना घेऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी धान खरेदीचा आढावा घेतला. मागील खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ३० क्विंटल धानाची राईस मिलर्सने भरडाईसाठी अद्यापही उचल केली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदीची कोंडी वाढली असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढून धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळ परिसरातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या घरांची व्यवस्था लवकरात लवकर करण्यास सांगितले. ग्रामपंचायत, खंडविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर वेगाने हालचाली करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पणन अधिकारी पाटील, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, विमानतळ संचालक विनय ताम्रकार,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेश चौबे, माजी आमदार संजय पुराम, लोकसभा संघटन मंत्री बाळा अंजनकर, महामंत्री संजय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष किसान आघाडी संजय टेंभरे,गजेंद्र फुंडे, ओम कटरे होते.
.............
त्या ३० प्रभावित गावांवर लक्ष ठेवा
पावसाळ्याला सुरुवात झाली असून आगामी काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना संदर्भात आढावा घेण्यात आला. मागील वर्षी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील ३० पेक्षा अधिक गावे प्रभावित झाली होती. त्यामुळे यावेळी ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने सज्ज राहून उपाययोजना करण्यास सांगितले.
..........
२१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस
कोरोना लसीकरणा संदर्भात यावेळी आढावा घेताना २१ जूनपासून सुरू होणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करावी. प्रत्येकाचे लसीकरण व्हावे यासाठी जनजागृती करावी. ४५ वर्षांवरील नागरिकसुद्धा लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे खा. मेंढे यांनी सांगितले.