गोंदिया : बँकेत जात असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून तिला एका हॉटेलात नेत तिची अश्लील चित्रफीत बनविली. तसेच मागील तीन महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या गोंदियाच्या इंदिरानगरातील २३ वर्षांच्या तरुणावर गोंदिया शहर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. नितेश देवीदास बोरकर (२३) रा. इंदिरानगर, पिंडकेपारटोली असे आरोपीचे नाव आहे.
मागील तीन महिन्यांपूर्वी गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणारी एक २४ वर्षाची तरुणी एसबीआय बँकेत जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवून तिच्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देत तिला कारंजा येथील एव्हरग्रीन हॉटेलात नेले. त्या हॉटेलात तिची अश्लील चित्रफीत तयार केली. अनेक निर्वस्त्र फोटोही घेतले. ते फोटाे व अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील तीन महिन्यांपासून अत्याचार करीत होता. तिने त्याच्या अत्याचाराचा विरोध केल्यास तिला शिवीगाळ करून ॲसिड टाकण्याची धमकी देत होता. या घटनेसंदर्भात पीडित तरुणीने २६ ऑक्टोबर रोजी गोंदिया शहर पोलिसांत तक्रार केली. आरोपीविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (२) (एन), ३४१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत.
पुन्हा एकदा एव्हरग्रीन हॉटेल चर्चेत
प्रियकरांचे व अश्लील चाळे करणाऱ्यांचे आश्रयस्थान बनलेल्या आयटीआयजवळील एव्हरग्रीन हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले. नागपूरच्या तरुणाची प्रेमप्रकरणातून आत्महत्या असो, आमगावातील तरुणीवर झालेला बलात्कार असो किंवा आता या तरुणीची तयार झालेली अश्लील चित्रफीत असो, अशा अनेक कारणांनी अधूनमधून एव्हरग्रीन हॉटेल चर्चेत असते.