नवेगावबांध : येथील जलाशय हे देशी-विदेशी पक्ष्यांसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. येथे विविध प्रकारच्या पानवनस्पतीदेखील आढळतात. येथील मासे अतिशय चवदार असतात असे अनेक खाद्यशौकिनांचे ठाम मत आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. परंतु मासेमारीसाठी निरूपयोगी असलेले जाळे तलाव परिसरात इतरत्र फेकण्यात येत असल्याकारणाने परिसरात वास्तव्यास असलेल्या पक्ष्यांसाठी व लहान-लहान प्राण्यांसाठी ते कर्दनकाळ ठरत आहे. सविस्तर असे की, नवेगावबांध जलाशय व त्याभोवतालचा परिसर देशी व विदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तलावाच्या परिसरात असलेल्या झुडपांत, गवतात व बेशरमच्या झाडांत काही पक्षी आपली वस्ती करतात. पाण्यात राहणारे पाणपक्षीदेखील तलावालगतच्या जमिनीवर येतात. म्हणजेच तलाव व ्याभोवतालचा परिसर पक्ष्यांना मुक्तपणे विहार करायला आदर्श ठिकाण आहे. एवढेच नव्हे तर या परिसरात ससा, साप, उंदीर, खार, सरडे इत्यादी प्राणी देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतात. परंतु माणसाच्या हलगर्जीपणामुळे या प्राणी आणि पक्ष्यांचा जीव धोक्यात आला आहे. मासेमारबांधव तलावात मासेमारी करतात. यासाठी ते बारीक प्लास्टिकच्या धाग्यांनी तयार केलेले जाळे वापरतात. हे धागे सहजासहजी तुटक नाहीत. मासेमारीसाठी निरूपयोगी झालेले ते जाळे मात्र तलाव परिसरातच फेकून दिले जाते. हे फेकून दिलेले जाळे कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण तलावाच्या भोवताल दिसून येतात. पक्षी जेव्हा पाण्याबाहेर येतात तेव्हा ते या जाळ््यामंध्ये अडकतात. सुटकेसाठी धडपड करताच ते अधिक गुंतून जातात व त्यातच त्यांचा मृत्यू होतो. अशीच अवस्था लहान-लहान प्राण्यांची देखील होत असते. जे जाळे अनेकांच्या हातांना रोजगार देतात, अनेकांच्या जिव्हा तृप्त करण्यास हातभार लावतात तेच जाळे मात्र या मुक्या जीवांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याचे कुणालाच काही वाटत नाही. वास्तवीक हे प्लास्टिकचे जाळे एकत्र करून जाळले तर पाच मिनिटांत नष्ट होतील किंवा एखाद्या खड्ड्यात गाडून देता येतील. परंतु या साध्या बाबींकडे देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे. तलाव परिसरातील फेकलेले संपूर्ण जाळे काढून परिसरातील प्राणी व पक्ष्यांना जीवदान देण्यात यावे अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. (वार्ताहर)वन्यजीव व पाटबंधारे विभागाची चिडीचूप४विशेष म्हणजे अगदी काही मीटर अंतरावरच वन्यजीव विभागाच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. दिमतीला अनेक कर्मचारीदेखील आहेत. परंतु त्यांचेही या प्रकाराकडे लक्ष नाही किंवा लक्ष असेलही परंतु कदाचित सोईस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या जलाशयात असणाऱ्या पाण्यावर आपला हक्क सांगणाऱ्या पाटबंधारे विभागाला या गोष्टींचे काही सोयरसुतक नाही. या प्राणी व पक्ष्यांची मासेमार, वन्यजीव विभाग व पाटबंधारे विभाग यापैकी कुणालाच काळजी नाही. याचेच मात्र नवल वाटते.
जाळे ठरताहेत पक्ष्यांसाठी कर्दनकाळ
By admin | Published: April 18, 2016 4:10 AM