लोकमत शुभवर्तमान : रोंघा येथे मुलींच्या सहकार्याने बांधले शौचालय
प्रशांत देसाई भंडाराज्या मुलींना अंगाखांद्यावर खेळवून लहानाचे मोठे केले. परंतु, शरीराने साथ देण्याचे सोडल्याने संपूर्ण आयुष्य उमेदीत जगणाऱ्या वडीलांना मुलींकडे शौचालय बांधून देण्याची गळ घालावी लागली. आयुष्यभर कुणाकडे हात न पसरविणाऱ्या वडिलांच्या आगळ्यावेगळ्या मागणीने मुलींनीही आर्थिक मदत केली व जावयांनी श्रमदान करून शौचालय बांधून दिले. तुमसर तालुकास्थळापासून ४० किमी अंतरावरील घनदाट जंगलात वसलेले रोंघा येथील बेनिराम कोडवते यांनी हा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. १,८२१ लोकवस्तीच्या गावातील हा प्रकार आहे. आमदार अनिल सोले यांनी रोंघा हे गाव दत्तक घेतले आहे. या आदर्श गावातील बेनिरामचे कुटुंब हागणदारीमुक्त गावाच्या यादीत ‘लयभारी’ ठरले आहे. या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथील नागरिक शेती व मोलमजुरीतून उपजिवीका करतात. बेनिराम यांच्याकडे अर्धा एकर शेती आहे. मात्र, सिंचनाची व्यवस्था नसल्याने निसर्गाच्या भरोशावर शेतीतून उत्पन्न घेतले जाते. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने बेनिरामने कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी गावातच चहाचे छोटेसे दुकान थाटले. यातूनच त्यांनी त्यांच्या तीन मुली व एका मुलाचे विवाह आटोपले. दरम्यान ७१ व्या वर्षी बेनिरामला डोळ्याचा आजार जडला. उतारवयात बेनिरामच्या आयुष्यात अंधार पसरला. यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यांना पत्नी गयाबाई व मुलगा समर्थपणे साथ देत आहे.आजपर्यंतची हयात त्यांनी उघड्यावर शौचास जावून काढले. यावेळी त्यांना अनेकांनी शौचालय बांधण्याचे सुचविले, पण कुणाचे ऐकेल तो बेनिराम कसला. दृष्टीदोष झाल्याने व शरीराचीही साथ मिळत नसल्याने मुलींकडून शौचालयासाठी पैसे मागितले व ते बांधकाम करून त्याचा वापर सुरू केला आहे. रोंघा गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पल्लवी तिडके, शशिकांत घोडीचोर, अनिता कुकडे, हर्षाली ढोके, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, सरोज वासनिक हे गृहभेट, समुह सभेच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत. अंध बेनिरामने शौचालय बांधण्याचा समाजाला दिलेला संदेश उघड्यावर शौचास जाणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.