प्रशांत कटरे : ओशनिक व्हिजन कॉलेजमध्ये रक्तदान शिबिरगोंदिया : रक्तदान करणे ही सर्वात मोठी सेवा आहे. रक्तदानातून समाज सेवेसोबतच देश् सेवा करण्याचे पुण्याचे काम आपण करु शकतो. म्हणून प्रत्येकाने रक्तदान करण्यासाठी स्वत:हून सामोर होवून बिनधास्त रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्य भारतीचे प्रमुख डॉ. प्रशांत कटरे यांनी केले. ते ओशनिक व्हिजन कॉलेज आॅफ सार्इंस येथे रक्तदान कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करीत होते. महाराष्ट्र शासनाच्या अनुलोम प्रकल्पांतर्गत डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूरच्या वतीने संजय भावे, विनायक नखाते आणि डॉ. प्रशांत कटरे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.डॉ. प्रशांत कटरे हे सर्वप्रथम स्वत: रक्तदानासाठी पुढे आले आणि रक्तदान करुन युवकांना प्रेरणा दिली. त्या पाठोपाठ १० युवक- युवती रक्तदानासाठी पुढे आले. यात शिवराम गंगबोईर, निहारिका उजवणे, हेमंत राखडे, विजय हरिणखेडे, पराग पटले यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. कटरे म्हणाले, आपल्या देशात दररोज चार कोटी लोकांना रक्ताची गरज पडते. मात्र वेगवेगळ्या मार्गातून फक्त ५० लाख लोकांनाच रक्ताची पूर्ती करण्यात येते. अनेक लोक रक्त न मिळाल्याने आपला जीव गमावतात. ही आपल्या देशाची व समाजाची मोठी शोकांतिका आहे. परंतु युवक-युवतींनी स्वच्छेने रक्तदान केल्याने या समस्येवर मात केली जावू शकते. रक्तदानाविषयी भ्रम व अज्ञान असल्यामुळे लोक रक्तदान करण्यास घाबरतात. परंतु प्रत्यक्षात रक्तदान करणारा व्यक्ती दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी देवूदूत ठरतो. त्याच बरोबर रक्तदानामुळे स्वत:चे शरीरसुद्धा स्वच्छ होवून नवीन रक्ताची निर्मिती होते. प्रत्येक तीन महिन्याने रक्तदान केल्यास कोणताही नुकसान न होता शरीराला फायदाच होतो. त्यामुळे युवक-युवतींनी स्वत:हून रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे, असे ते म्हणाले. संचालन प्राचार्य डॉ. नर्मदाप्रसाद भिमटे यांनी केले. आभार सुमती डोलारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नितीन गायधने, पराग पटले, हेमंत राखडे, डॉ. राकेश राखडे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
रक्तदान म्हणजे सर्वात मोठी सेवा
By admin | Published: September 22, 2016 12:42 AM