खातिया : रक्तदानाने आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. यामुळेच रक्तदानाला जीवदान व महादान म्हटले जाते. यामुळे आपण रक्तदान करून दुसऱ्यांचे जीवन वाचवावे असे प्रतिपादन बिरसी विमानतळचे संचालक विनय ताम्रकार यांनी केले.
बिरसी विमानतळावर येथे गुरूवारी (दि.१५) भारतीय विमानपत्तन प्राधीकरणच्यावतीने अभीनव भारत ६५ व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, डॉ. इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान अकॅडमीचे संचालक कृष्णेन्दु गुप्ता, रमा के.रमन, बिरसी विमानतळ समितीचे सदस्य डॉ. प्रशांत कटरे, मुख्य सुरक्षा अधिकारी मिलेंद्र निरमातकर, एन.एम.टी.आयचे मुख्य उडान प्रशिक्षक दीपक चंद्रन आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बिरसी विमानतळ कर्मचाऱ्यांसह अनेकांनी रक्तदान केले. याप्रसंगी डॉ. नितीन तिरपुडेे यांनी एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा धक्का बसल्यावर प्रथमोपचार कसे करावे यावर सर्वांना मार्गदर्शन केले.