गोंदिया : जिल्हा प्रशासन व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणारा बोदलकसा पक्षी महोत्सव पर्यटक व अभ्यासकांना पर्वणी ठरणार असून, पक्षीनिरीक्षण, वन भ्रमंती, लोककला, बचत गटनिर्मित पदार्थ, ग्रंथप्रदर्शन अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणीच या महोत्सवात असणार आहे. पक्षीप्रेमी, अभ्यासक व विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची व अभ्यासाची संधी प्राप्त होणार आहे. २७ व २८ फेब्रुवारी रोजी हा महोत्सव प्रस्तावित असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली.
बोदलकसा पक्षी महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आज अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, विशेष निमंत्रित डॉ. राजेंद्र जैन, अजय अग्रवाल, मुकुंद धुर्वे, किरण पुरंदरे व विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोविड व पर्यावरणाच्या
नियमांना अनुसरून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे आयोजन करण्यात
येईल. गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा पक्षी महोत्सवाचा यात समावेश आहे. त्या अनुषंगाने आज बैठक घेऊन पक्षी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले. गोंदिया जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा आणि जिल्ह्याचे सौंदर्य या महोत्सवातून पाहण्याची संधी यानिमित्ताने पर्यटकांना मिळणार आहे, असे खवले म्हणाले. या महोत्सवाच्या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. विशेष निमंत्रित व्यक्तींनी यावेळी बहुमोल सूचना केल्या.
.....
महोत्सवात विविध प्रकारचे ५० स्टॉल
बोदलकसा पक्षी महोत्सवात विविध प्रकारचे ५० स्टॉल लावण्याचे नियोजन आहे. यात प्रामुख्याने पक्षी छायाचित्र प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, आत्मा, कृषी व माविम बचत गटाची उत्पादने आदींचा समावेश असणार आहे. पक्षी संमेलन हे या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. यात पक्षीतज्ज्ञ आपले अनुभव कथन करणार आहेत. महोत्सवात येणाऱ्या पर्यटक, अभ्यासक व विद्यार्थ्यांना वन भ्रमंतीसह पक्षीनिरीक्षणाची संधी प्राप्त होणार असून, तेही पक्षीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात. हा दुर्मीळ व अवर्णनीय आनंद असणार आहे. पक्ष्यांच्या विविध जाती-प्रजाती, त्यांचे आवाज, त्यांच्या सवयी हे सगळे जवळून अनुभवण्याचा योग या महोत्सवात मिळणार आहे.