सुकडी-डाकराम : तिरोडा तालुक्यातील बोदलकसा, मंगेझरी-खाडीपार हा डांबरी रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक जि. प. बांधकाम विभागाकडे करण्यात आली. मात्र, त्यांनी याची अद्यापही दखल घेतली नसल्याने समस्या कायम आहे.
बोदलकसा ते मंगेझरी-खाडीपार हा मुख्य जिल्हा मार्ग असून हा रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. हा मुख्य मार्ग असल्यामुळे या मार्गाने अनेक जड वाहने नियमित जातात. त्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गोरेगाव ते तिरोडा जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा आहे. पण या मार्गाने रेती वाहून नेणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. मागील वर्षभरात या मार्गावर २५ ते ३० जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा संबंधित विभागाकडे अनेकदा करण्यात आली पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. लोकप्रतिनिधींचे सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
.....
खराब रस्त्यामुळे कामगारांना त्रास
तिरोडा येथे अदानी विद्युत प्रकल्प असल्यामुळे या कंपनीमध्ये कुऱ्हाडी, खाडीपार, तिमेझरी, बोळुंदा, आसलपाणी, पाथरी, मंगेझरी, कोडेबर्रा, गोरेगाव, कटंगी, हिरापूर, रामाटोला, मलपुरी या गावांतून अनेक कामगार या प्रकल्पात काम करण्यासाठी दररोज ये-जा करतात; पण या रस्त्याची गिट्टी उखडल्यामुळे रस्त्यामध्ये मोठे-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे कामगारांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे.
.....
पर्यटकांना होतोय त्रास
नागझिरा व्याघ्र प्रकल्प लागून असल्याने पर्यटक नेहमीच येतात. बोदलकसा येथे पर्यटन विभागाचे निवासस्थान व तलाव, जंगल असल्यामुळे पर्यटक नेहमीच येतात. या रस्त्याने मंत्री, खासदार, जिल्हाधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकारी येतात जातात पण याकडे कुणीच लक्ष देत नाही. हा परिसर नक्षलग्रस्त व आदिवासी जंगलव्याप्त असल्याने कुणी लक्ष देत नाही. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.