आंभोरा अपघातातील जखमीचा मृत्यू : डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गोंदिया : गोंदिया-बालाघाट या आंतरराज्यीय मार्गावर एका इंडिका कारने प्रवासी घेऊन जाणाऱ्या आॅटोला जबर धडक दिल्याने आॅटोमधील दोन जण जागीच ठार होऊन आठ लोक जखमी झाले होते. या अपघातातील एका गंभीर जखमींचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या जखमीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी तब्बल दोन तास गोंदियाच्या मेडिकल कॉलेज परिसरात मृतदेह रोखून धरला. यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास गोंदियातील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डान प्रशिक्षण संस्थेच्या (एनएफटीआय) कारने आंभोरा येथील या आॅटोला धडक दिली. यात वाहन चालक किशोर रामटेके व आर्यन नावाचा नऊ वर्षाचा मुलगा घटनास्थळीच मरण पावला. आॅटोमधील आठ लोक जखमी झाले होते. या जखमीतील संतोष मंगरू चामलाटे (२६) यांचा गोंदियातील मेडिकल कॉलेज-रुग्णालयातून नागपूरला पुढील उपचारासाठी नेताना लाखनीनजीक मृत्यू झाला. गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी रूग्णावर उपचार केला नाही. त्यामुळेच त्या रुग्णाची प्रकृती खालावली आणि मग त्या रूग्णाला नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला, असा आरोप नातेवाईकांनी केला. नागपूर येथे रूग्णाला नेण्यासाठी शासकीय रूग्णवाहिका दिली नाही. खासगी रूग्णवाहिकेतून न्या, असा सल्ला देण्यात आला. त्या खासगी रूग्णवाहिकेत कृत्रिम श्वास देणारो आॅक्सिजन सेट नव्हता, साधी सलाईनही नव्हती. गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये रूग्ण असताना त्याच्यावर उपचार झाला नाही. नागपूरला रवाना करताना त्यांना कसलीच मदत केली नाही. त्यामुळे संतोष चामलाटे (२६) रा.आंभोरा या जखमी तरूणाचा नागपूरला नेत असताना मंगळवारच्या सायंकाळी ४.३० वाजतादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आला. बुधवारी सकाळी १० वाजता उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह मृताच्या नातेवाईकांना देण्यात आला. परंतु मृतदेह नेणार नाही, असा पवित्रा रूग्णांच्या नातेवाईकांनी घेतला. जेव्हापर्यंत हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार नाही, वैद्यकीय अधिष्ठाता यांना निलंबित करणार नाही, तेव्हापर्यंत मृतदेह घरी नेणार नाही, असा पवित्रा घेत मोठ्या संख्येने नातेवाईक व गावकऱ्यांनी मेडिकल कॉलेज परिरसरात आंदोलन केले. मृतदेहाला घरी घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहिका शवविच्छेदन गृहासमोरून नेत असताना केटीएसच्या गेटवर दोन वेळा त्या रूग्णवाहिकेला थांबविण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनात आरोग्य प्रशासनाने चौकशी करून डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरच तो मृतदेह नेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी) रूग्णांना मिळतात मरणयातना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अपघात होऊन जखमी झालेल्या रूग्णांंना मरणयातना मिळत आहेत. अपघात होऊन आलेल्या व्यक्तींच्या निकामी अवयवांवर दुसऱ्याच दिवशी शस्त्रक्रिया करणे अपेक्षित आहे. परंतु येथे १५-१५ दिवस रूग्णांकडे लक्ष दिले जात नसून त्यांच्यावरील उपचारांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अपघातातील गंभीर जखमींना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. जबाबदारी एकमेकांवर ढकलतात मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांचा डॉक्टरांकडून उपचार होत नाही. येथील वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यांच्या ढिसाळ कारभारामुळे रूग्णांचा मृत्यू होत आहे. परंतु येथील आरोग्य सेवेसंदर्भात डॉ.केवलिया केटीएस रुग्णालयाकडे बोट दाखवितात. तर जिल्हा शल्यचिकित्सक संपूर्ण कारभार वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडे असल्याचे सांगतात. दोन्ही अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असतात.
डॉक्टरांवर कारवाईसाठी दोन तास रोखला मृतदेह
By admin | Published: March 02, 2017 12:08 AM