आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप : संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह उचललालोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कर्ज घेतलेले पैसे परत करण्यास असमर्थ असल्याने विष प्राशन करून मोहाटोला येथील शेतकरी हंसराज माणिक डहारे (२८) याने आत्महत्या केली. तर आत्महत्येसाठी त्याला प्रेरीत करण्यात आल्याचा आरोप करीत हंसराजच्या कुटूंबीयांनी त्याचा मृतदेह शनिवारी (दि.१०) दुपारी कावराबांध येथील पोलीस पाटील पोषण बनोठे यांच्या दारात नेऊन ठेवला. पोलिसांनी वेळीच परिस्थिती सांभाळून पोलीस पाटलांचा भाऊ व त्याच्या कुटूंबीयांना ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला. मोहाटोला येथील हंसराज डहारे हा अल्पभूधारक शेतकरी पत्नी, तीन मुली व आईसह पोलीस पाटलाच्या शेजारीच राहत होता. गावातच त्याची अडीच एकर शेती आहे. काही महिन्यांपुर्वी त्याने पोलीस पाटलाचा भाऊ तिलक बनोठे यांच्याकडून ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच त्याच्या एका दुसऱ्या भावाकडूनही जवळपास तेवढेच कर्ज घेतले. काही दिवसापुर्वी तिलक बनोठे याने आपले कर्ज परत मागितले. परंतु हंसराज याने कर्ज परत करण्यास असमर्थता दाखविली व मोबदल्यात आपली शेत जमीन विक्री करुन देण्याची तयारी दाखविली. पोलीस पाटलाचा भाऊ तिलक बनोठे आणि त्याचा आणखी एक भाऊ ओसम बनोठे याचे एकंदरीत मिळून कर्ज आणि व्याजाची रक्कम मिळून जवळपास ९० हजारांचे कर्जाची परतफेड हंसराजला करायची होती. त्याबद्दल्यात तो जमीन देण्यास तायर झाला. परंतु जेव्हा शेत जमिनीची रजिस्ट्री करायला गेले असता किती जमीन विक्री खरेदी करायची याबद्दल ताळमेळ झाला नाही आणि जमिनीचा सौदा फिस्कटला. त्यामुळे हंसराज जमीन विक्री करण्यास नकार देत घरी परतला व शुक्रवारी (दि.९) रात्री त्याने विष प्राशन केले. त्याला गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले. परंतु तेथे मध्यरात्री २ वाजता त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मर्ग दाखल करीत त्याचा मृतहेद शवविच्छेदनानंतर गावी आणून अंत्यसंस्कारासाठी न नेता थेट शनिवारी (दि.१०) दुपारी पोलीस पाटीलाच्या दारावर नेऊन ठेवला. आत्महत्या करण्यासाठी तुम्ही प्रेरित केले असा आरोप करीत तुमच्यावर कार्यवाही झाल्याशिवाय व याचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही मृतहेद उचलणार नाही असा हट्ट धरला. पोलीस पाटील पोषण बनोठे यांनी त्यांची पत्नी मंजलता बनोठे या कावराबांध ग्रामपंचायतच्या सरपंच असून ते व त्यांचे भााऊ तिलक बनोठे आणि सर्व कुुटुंबिय एकाच घरी वास्तव्यात असून काही राजकीय विरोधकांनी संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत पोलीस पाटील पोषण बनोठे आणि त्यांची पत्नी सरपंच मंजु बनोठे यांच्यावर ही कारवाई व्हावी याची मागणी करु लागले. हे दृष्य बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने महिला-पुरुष घटनास्थळी जमले. काहींनी पोलीस पाटलाच्या घरावर धाव बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. परंतु या दरम्यान सालेकसा पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून गर्दीवर नियंत्रण मिळविले. तसेच पोलीस पाटलांच्या कुटुंबांना इजा होवू नये यासाठी काही गावकरी युवक सुद्धा सज्ज राहिले. कुटुंबाचे लोक मृतहेद उचलण्यास तयार होताना दिसत नसल्याचे पाहून पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी आपल्या सहकाऱ्यासह पोलीस पाटलांचा भाऊ व त्यांच्या कुटुंबाला ताब्यात घेतले व योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली. तेव्हा हंसराजचा मृतहेद अंत्यसंस्कारासाठी उचलण्यता आला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात सायंकाळी उशिरापर्यंत हंसराजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गरीब शेतकरी हंसराज डहारे यांच्या कर्जापायी आत्महत्येमुळे कुटुंबावर ऐन पावसाळ्यांच्या तोंडावर संकटाचे आभाळ कोसळले आहे. ही एक मोठी दुखाची बाब आहे.
शेतकऱ्याचा मृतदेह पोलीस पाटलाच्या दारी
By admin | Published: June 12, 2017 1:24 AM