गोंदिया: सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार पालकांनी पुस्तके परत केली आहेत. उर्वरित पालकांनी आपापल्या पाल्यांची जुनी अभ्यासक्रमाची पुस्तके परत करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
मागच्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ वी च्या मुलांना १ लाख १७ हजार पुस्तकाचे संच वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ८ हजार पालकांनी पुस्तकांचे संच आपापल्या तालुक्यातील गटसाधन केंद्राकडे पाठविण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पुस्तके परत मागविण्यासाठी वारंवार सूचना केल्या आहेत.
.......
८ हजार पालकांनी केली पुस्तके परत
- मागच्या वर्षीच्या वाटप केलेल्या १ लाख १७ हजार पुस्तकांपैकी उर्वरित पुस्तके सर्व शिक्षा अभियानाला आली नाहीत.
- शासनाने मागच्या वर्षी एकट्या गोंदिया जिल्ह्यावर २ कोटी ५५ लाख ६३ हजार ४२४ खर्च करून पुस्तके वाटप केली. पुस्तके परत केल्याने शासनाचा तेवढा भार कमी होणार आहे.
- पालकांनी आपापल्या पाल्यांची पुस्तके तालुकास्तरावर जमा करावी जेणेकरून नवीन पुस्तकांचा भुर्दंड यंदा शासनावर बसणार नाही.
.................................
मागील वर्षी संच वाटप - १ लाख १७ हजार
यावर्षी मागणी -९८ हजार
...................
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पहिली-१४५६५
दुसरी-१८५४२
तिसरी-२०१७६
चवथी- २०४०६
पाचवी-१९६६४
सहावी-१९४४०
सातवी-१९६५०
आठवी-२०६०१
......................................
शासन आमच्या मुलांची काळजी घेऊन त्यांच्या उत्थानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शिक्षणासाठी पुस्तके, गणवेश देते. दरवर्षी दिलेली पुस्तके परतही मागत नाही. परंतु कोरोनाचे संकट पाहून पुस्तके परत मागितली त्यामुळे जबाबदार पालक म्हणून मी पुस्तके परत केली.
- अविनाश मेंढे, पालक खातिया.
......
माझ्या मुलाला दिलेली पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कामात यावीत त्यांनीही शिक्षण घेऊन गुणवंत व्हावे यासाठी मागितलेली पुस्तके आम्ही परत केली आहेत.इतर पालकांनीही पुस्तके परत करावीत असे मला वाटते.
-दिलीप महारवाडे, पालक किडंगीपार
.....................
ज्या विद्यार्थ्यांची मागील वर्षाची पुस्तके तालुकास्तरावर जमा झाली नाहीत अशा पालकांनी आपापल्या पाल्यांची मिळालेली सर्व पुस्तके परत करावीत. जेणेकरून ती पुस्तके इतर विद्यार्थ्यांच्या कामात येतील.
- राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया.