गोंदिया : जिल्ह्यातील चारही आमदारांनी गेल्या चार वर्षात आपल्या स्थानिक विकास निधीतून विविध कामे प्रस्तावित केली. त्याला जिल्हा नियोजन विभागाने मंजुरीही दिली आहे. परंतू निवडणुकीचे वर्ष असताना २०१३-१४ या आर्थिक वर्षात २ कोटींचा निधी खर्च करण्यात कोणत्याही आमदाराला यश आलेले नाही. आतापर्यंतचा निधी खर्च करण्यात तिरोड्याचे आमदार डॉ.खुशाल बोपचे आघाडीवर असून सर्वात कमी निधी आमगावचे आमदार रामरतन राऊत यांच्या निधीतून खर्च झाला आहे. सर्व आमदारांना आपल्या मतदार संघात विविध कामे करण्यासाठी वर्षाला २ कोटी रुपये स्थानिक विकास निधी मिळतो. विविध सरकारी विभागांच्या माध्यमातून ती कामे केली जातात. त्यासाठी ज्या गावांमध्ये ज्या कामांची आवश्यकता आहे ती कामे आमदार जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित करतात. नियोजन विभागाचे मंजुरी दिल्यानंतर संबंधित यंत्रणेमार्फत ती कामे केली जातात.विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी आता अवघे तीन महिने बाकी आहेत. त्यातही आचारसंहिता लागण्यासाठी अवघे तीन आठवडेही शिल्लक नाहीत. त्यामुळे या कालावधीत संपूर्ण पाच वर्षाचा १० कोटी रुपये निधी खर्च होणे अपेक्षित आहे. परंतू दरवर्षी मिळणाऱ्या २ कोटी रुपयातून शिल्लक राहणाऱ्या निधीच्या दिड पट निधी दुसऱ्या आर्थिक वर्षात अतिरिक्त निधी म्हणून मंजूर केला जातो. मात्र शेवटच्या वर्षी केवळ प्रत्यक्ष शिल्लक असणाऱ्या निधीतूनच कामे मंजूर केली जातात. (जिल्हा प्रतिनिधी)
विकास निधी खर्च करण्यात बोपचे आघाडीवर
By admin | Published: July 24, 2014 11:55 PM