गोंदिया : जागृती सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांच्या घोळ प्रकरणी काही संचालक व कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर घोळ उघडकीस येऊ नये म्हणून दोन कर्मचाऱ्यांनी रेकॉर्ड गहाळ केले. प्रशासकाने याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमवारी (दि.१६) पहाटे एका आरोपीला अटक केली तर दुसऱ्या आरोपीला बुधवारी (दि.१८) सकाळी १० वाजता अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटकासुद्धा करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तिरोडा तालुक्यातील ग्राम मुंडीटोका येथील जागृती सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा अपहार संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यानी केला. या प्रकरणात ठेवीदारांच्या दबावानंतर जिल्हा निबंधकांनी चौकशी केली. दरम्यान संचालक मंडळ व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या संस्थेवर निबंधकांनी प्रशासक नेमले. प्रदीप मेश्राम यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले.
जागृती पतसंस्थेच्या घोळ उघड होऊ नये म्हणून कर्मचारी चंद्रशेखर भाऊदास मडावी व माजी शाखा व्यवस्थापक हेमंतकुमार देवीदास सातभाये (४६,रा. मुंडीकोटा) या दोन्ही आरोपींनी पतसंस्थेची ६ जून रोजी शाखा बंद असताना महत्वाची कागदपत्रे गहाळ केली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणे गरजेचे असताना प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, नंतर प्राधिकृत अधिकाऱ्यानी पोलिसांत तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपींविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३८०, ४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ठाणेदार योगेश पारधी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही आरोपींचा शोध घेणे सुरू केले. शेवटी चंद्रशेखर मडावी याला सोमवारी पहाटे त्याच्या घरून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जामिनावर त्या आरोपीची सुटका करण्यात आली. तर दुसरा आरोपी हेमंतकुमार सातभाये याला बुधवारी सकाळी १० वाजता अटक करण्यात आली. त्याचीही जामिनावर सुटका करण्यात आली आहे.