अमरजित जमईवार व त्यांचे वडील शेतावर पाईप लाईनचे काम चालू असताना पाहण्यास गेले होते. सोबत लहान मुलगा सार्थक हा देखील त्यांच्यासोबत गेला होता. दरम्यान सार्थक शेतात उभा असताना दबा धरुन बसलेल्या रानडुकराने सार्थकवर हल्ला करुन गंभीर जखमी केले. सार्थकने आरडाओरड केल्यानंतर त्याचे वडील आणि आजोबा सार्थककडे धावत जावून रानडुकराला परतवून लावले. यात सार्थकच्या पायाला दुखापत झाली आहे. सार्थकला त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा बुजरुक येथे दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले. या घटनेची माहिती तिरोडा वनविभागाला देण्यात आली.
....
रानडुकरांचा हैदोस वाढला
बिहिरीया शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आतापर्यंत अनेक जणांवर रानडुकरांनी हल्ला करुन जखमी केले आहे. शिवाय शेतातील पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी अनेकदा वनविभागाकडे तक्रारी केल्या मात्र त्यांनी पंचनामे करुन मोकळे होण्यातच धन्यता मानली आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रानडुकराचा बंदोबस्त लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.