गोंदिया : तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी तहसील कार्यालयात गुरुवारी (दि.११) पत्रकारांसाठी सभेचे आयोजन केले होते. ही सभा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत होणार होती; मात्र पत्रकारांना योग्य वागणूक, सन्मानजनक व्यवहार व सहकार्य तहसीलदारांकडून मिळत नाही. त्यामुळे तिरोडा तालुका पत्रकार संघाने तहसीलदारांनी बोलाविलेल्या सभेवरच (परिषद) बहिष्कार टाकला. तिरोड्याच्या इतिहासात प्रथमच ही घटना घडली आहे.
सविस्तर असे की, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २५ ऑक्टोबर २०२१ व प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या ११ ऑक्टोबर २०२१ च्या पत्रान्वये तहसीलदार घोरुडे यांनी या सभेचे आयोजन केले होते. त्यात ‘मतदार यादीतील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, तसेच नवीन नोंदणी इत्यादी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत पोहोचावी, याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन’ हे या सभेसाठी विषय होते.
तिरोडा विधानसभा मतदार संघांतर्गत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करणे व उपक्रम राबविण्याचे निर्देश प्रशासनाला वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी गुरुवारी तालुक्यातील केवळ ७ प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलाविले होते; मात्र तहसीलदार घोरुडे यांच्याकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कधीच सन्मानपूर्वक वागणूक व सहकार्य मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन अख्ख्या तिरोडा तालुका पत्रकार संघाने या सभेवर बहिष्कार घातला. त्यामुळे कोणत्याही प्रसार माध्यमाचा प्रतिनिधी या सभेला उपस्थित राहिला नाही.
तहसीलदार घोरुडे यांच्याकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सन्मान व सहकार्य नसल्यामुळे तालुक्यातील सर्व पत्रकारांनी त्यांचा निषेध व्यक्त केला. उल्लेखनीय म्हणजे, तिरोडा तालुका पत्रकार संघातील काही पत्रकारांनी थेट तहसील कार्यालयात जावून सभेवर आमचा बहिष्कार असल्याचे तहसीलदारांना सांगितले. तालुका पत्रकार संघात प्रिंट, पोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे; मात्र तहसीलदारांनी केवळ ७ प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून पत्रकार संघाचा अवमान केल्याने सर्वच पत्रकारांनी पाठ फिरविली.
तिरोड्याच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या या घटनेची एकच चर्चा तालुक्यात रंगली असून, हे वृत्त वाऱ्यासारखे पसरत आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असून, जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार घोरूडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तालुका पत्रकार संघाने केली आहे.