तिरोडा : शहरात ६ एप्रिलपासून शासनाचे नवीन निर्बंध लागू करून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आले. यामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले असून व उद्याेगधंदेसुद्धा डबघाईस आले आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात आ. विजय रहांगडाले यांच्या उपस्थित बुधवारी (दि.७) बैठक घेण्यात आली.
लाॅकडाऊनचे आदेश आल्याने तिरोडा शहरातील अत्यावश्यक साहित्याचे दुकाने वगळता सर्व दुकाने नगर परिषद प्रशासनाद्वारे बंद करण्यात आले. याचा विपरीत परिणाम तिरोडा शहरात व ग्रामीण भागात सुरू असलेले घरकुल बांधकाम, रोजंदारी तत्त्वावर काम करणारे मजूर, व्यापारी वर्गावर होत आहे. त्यामुळे संपूर्ण लाॅकडाऊन न लावता काही प्रमाणात शिथिलता देण्याबाबत व्यापारी वर्गाने आ. विजय रहांगडाले यांना यावर तोडगा काढण्याची मागणी केली. यावर रहांगडाले त्वरित न.प. प्रशासन, तालुका दंडाधिकारी, पोलीस प्रशासनाची बैठक बोलावली व सदर व्यापारी वर्ग व नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सोनाली देशपांडे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, न.प. मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगरसेवक राजेश गुणेरीया उपस्थित होते. या बैठकीत पोलीस प्रशासनाने व्यापारी वर्गास सहकार्य करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच तिरोडा शहरात पिणाच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होत असून २० एप्रिलपासून तिरोडा शहरातील नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचेही निर्देश आ. रहांगडाले यांनी दिले.