कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आले असून ते नियम वाहन चालविणाऱ्या व्यक्तीसह पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठीही आहेत. मात्र असे असतानाही कित्येकांकडून नियमांना तोडून वाहन चालविले जाते व त्याचे परिणाम अपघाताच्या रूपात पुढे येतात. यात कित्येकदा हे अपघात जीवावर बेततात व ज्यात वाहन चालविणाऱ्यासह पुढील व्यक्तीचाही जीव जातो. यामुळेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र एवढ्यावरच पुरेसे नसून वारंवार नियमांना तोडणाऱ्यांचे नाईलाजास्तव लायसन्सही वाहतूक नियंत्रण शाखेकडून रद्द केले जातात. म्हणूनच वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेची नजर असून नियम तोडल्यास लायसन्स रद्द होऊ शकते. हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन - वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे तसेच अतिवेगात वाहन चालविल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते. - मद्यप्राशन, अंमली पदार्थांचे सेवन करून तसेच सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते. - मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक करीत असल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.
अशी होते कारवाई... वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीला २-३ वेळा दंडात्मक कारवाई करून सोडले जाते. मात्र वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाते. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो. तेथून परवानगी येताच अशा व्यक्तीचे वाहनही जप्त केले जाते.
आधी मुदत नंतर कारवाई - एखाद्याकडून नियमांचे वाहतूक नियमाचे उल्लंघन झाल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र त्यानंतरही वारंवार ती व्यक्ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असेल तर मात्र अशाला ठराविक कालवधीसाठी मुदत दिली जाते. मात्र त्यानंतरही काहीच फरक पडत नसल्यास लायसेंस रद्दचीच कारवाई करावी लागते.
नियमांचे पालन करा... वाहतुकीचे नियम हे सर्वांच्याच सुरक्षेसाठी आहेत. वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला अपघातांच्या रूपात दिसून येतात. यामुळे नियमांचे पालन करूनच नेहमी वाहन चालवा. कारण वाहतूक पोलिसांची तुमच्यावर नजर असून नियम तोडले जात असल्यास कारवाई केली जाणार.
- युवराज हांडेनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया