सावंगी-भदूटोला पुल : क्युरिंगची व्यवस्था नाही, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : तालुक्यातील सावंगी- भदूटोला मार्गावरील पुलाचे बांधकाम होत असून या निर्माणाधीन पुलाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजण्याची गरज आहे. मात्र येथे महिला मजूरांकडून लोट्याने पाणी टाकले जात असल्याने या पुलाची तहान भागत नाही. अशात या पुलाचे बांधकाम किती मजबूत होणार असा प्रश्न पडतो. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. भदूटोला-सावंगी मार्गावरील पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दोन कोटी ५० लाख रूपयांच्या निधीतून या पुलाचे बांधकाम होत आहे. हा पुल तयार झाल्यास तालुक्यातील भदूटोला, पळसगाव, राका, पिपरी, चिखली, कनेरी, मनेरी, गोंडउमरी, कोकणा-जमी., परसोडी आदि गावातील जनतेला फायद्याचे ठरणार आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून या पुलाला महिला मजूरांकडून पाणी टाकण्याचे (क्युरींग) काम केले जात आहे. पाणी टाकण्याचे हे काम दिवसातून दोन-तीन वेळा होणे गरजेचे आहे. सिमेंट-कॉंक्र ीटच्या कोणत्याही बांधकामाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजणे गरजेचे असते. त्याशिवाय ते बांधकाम मजबूत होत नाही. अशात येथे मात्र दिवसातून महिला मजूरांकडून लोट्याने पाणी टाकण्याचे काम सुरू आहे. अशात या पुलाची बांधकाम किती मजबूत होणार याबाबत सांगणे कठीण आहे. पुलाला पुरेपूर प्रमाणात पाणी टाकले जात नसल्याची माहिती पळसगाव व भदूटोला येथील गावकऱ्यांनी पुलाजवळ जावून संबंधीत अभियंत्यांना दिली. मात्र त्यात कोणतीही सुधारणा करण्यात आली नसल्याची खंत स्वत: जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती राजेश नंदागवळी यांनी व्यक्त केली. शासनाकडून जनतेच्य सोयीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करून बांधकाम केले जाते. मात्र कंत्राटदार व सबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बांधकामाची गुणवत्ता राहत नाही. अशात कित्येकदा असे बांधकाम ढासळते. यात जिवीतहानीचे प्रकारही घडतात. आता संबंधीत अधिकाऱ्यांनी बांधकामाकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पुलाचे बांधकाम धोकादायक पुलाचे बांधकाम धोकादायक सिमेंट-कॉंक्रीटच्या बांधकामाला मोठ्या प्रमाणात पाणी पाजावे (क्युरींग) लागते. त्याशिवाय बांधकाम मजबूत होत नाही. पूरेपूर प्रमाणात पाणी मिळाले नाही तर बांधकामाची गुणवत्ता राहत नाही व असे बांधकाम कधी खचणार याचा नेम नसतो. अशात पुलाच्या बांधकामावर पाणी पाजण्याचीच समस्या असताना पुलाचे बांधकाम किती मजबूत होणार हे सांगणे कठीण आहे. यातून जनतेच्या पैशांची नुसती नासाडी केली जात असल्याचे बोलले जात आहे.
निर्माणाधीन पुलाची तहान भागेना
By admin | Published: June 08, 2017 2:08 AM