गोंदिया : अल्पवयीन साळीचे अपहरण करून नेणाऱ्या भाटव्याला गंगाझरी पोलिसांनी अखेर घटनेच्या चौथ्या दिवशी नागपूर येथून ताब्यात घेतले. सोमवारी (दि.१८) रोजी आरोपी भाटव्याला गंगाझरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
तिरोडा तालुक्याच्या मारेगाव (वडेगाव) येथील अशांत राजकुमार कठाणे याने आपल्या अल्पवयीन १७ वर्षीय साळीचे एकोडी येथील जिल्हा परिषद शाळेतून ११ ऑक्टोबर रोजी अपहरण करून नेले होते. आई-वडिलांच्या तक्रारीनुसार, आपली मुलगी एकोडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकायला गेली. मात्र सायंकाळी घरी परत आली नाही. अशी तक्रार १३ ऑक्टोबर रोजी गंगाझरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
घटनेच्या दिवसांपासून दोन दिवसापर्यंत आई-वडिलांनी शोधाशोध केला. पण मुलीचा पत्ता लागला नाही. दरम्यान जावयाचा फोन बंद असल्याचे आढळले. त्यामुळे आई-वडिलांची शंका जावायवर निर्माण झाली. त्यांनी ही बाब गंगाझरी पोलिसांना सांगितली. गंगाझरीचे ठाणेदार पोपट टिकेकर यांनी काही फोन नंबर मागून सहकार्य करण्यास फिर्यादीला सांगितले.
१६ ऑक्टोबर रोजी मुलीने आपल्या खात्यातून दहा हजार रुपये विड्राल केले. त्यावरून ते नागपूर येथे असल्याचे गंगाझरी पोलिसांच्या लक्षात आले. ठाणेदार पोपट टिकेकर यांनी पोलिसांचे एक पथक तयार करून नागपूरला रवाना केले. या पथकात मुकेश शेंडे, महेंद्र कटरे व महिला पोलीस कविता बोपचे यांचा समावेश होता. त्याच बरोबर गणेशपेठ नागपूरच्या पोलिसांना सूचना देऊन ताब्यात घ्यायला सांगितले. नागपूरच्या गणेशपेठ येथील शुक्ला लॉज येथून आरोपी अशांत राजकुमार कठाणे व मुलगी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गंगाझरी पोलिसांच्या स्वाधीन केले. गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३, ३७६, (१) (२) व एन.सह कलम ४ व ६ (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार पोपट टिकेकर करीत आहेत.