गोंदिया : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने कोरोनाबाधितांचा आलेखही वेगाने उंचावत आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयात बाधित रुग्णांना उपचार घेण्यासाठी साधे बेडसुद्धा उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. या बाबीची दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाने त्वरित आमसभेचे आयोजन करून शहराच्या प्रत्येक वाॅर्डात १० बेडचे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक तथा जयश्री महाकाल सेवा संस्था, गोंदियाचे अध्यक्ष लोकेश (कल्लू) यादव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी तथा नगराध्यक्ष यांना दिले आहे.
कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपायोजनांचेही पालन करण्यात येत आहे. मात्र बाधितांची संख्या सतत वाढत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वाढती रुग्णसंख्या बघता, रुग्णालयात रुग्णाला बेडसुद्धा उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. अनेकांना तर रुग्णालयात बेड नसल्याने घरीच आपले उपचार करून घ्यावे लागत आहेत. या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्यावतीने शहरातील २१ वाॅर्डामध्ये १० बेडचे रुग्णालय उभारण्यात यावे, ज्यामध्ये २ ऑक्सिजन सिलिंडर, १ डॉक्टर, २ नर्स व १ वाॅर्ङबाॅय यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांनी केली आहे.