लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया शहराच्या विकासाला भरपूर वाव असून सर्वांच्या सहकार्याने या शहराचा विकास करणे शक्य आहे. गोंदियात आता उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या कामांना आता सुरुवात झाली आहे. तिरोडा-कटंगी-बालाघाट या नवीन रिंग रोडच्या कामालासुद्धा लवकरच मंजुरी देऊन सुरुवात केली जाईल. यासाठी या मार्गावरील मेडिकल कॉलेजच्या परिसरात नवीन गोंदिया शहर व स्मार्ट सिटी तयार करा यासाठी जे सहकार्य आणि जेवढा निधी लागेल तो मी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि. २९) गोंदिया येथील क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात दिली.तिरोडा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग ७५६ चे २८ किमीचे २३९.२४ कोटींचे व आमगाव-गोंदिया ५४३ महामार्गाचे २० किमीचे २८८.१३ कोटींच्या कामांचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन शहरातील क्रीडा संकुलात रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर खा. प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, अशोक नेते, आ. विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, परिणय फुके, जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ. गोपालदास अग्रवाल, राजेंद्र जैन, केशव मानकर, संजय पुराम, रमेश कुथे, खोमेश रहांगडाले, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे उपस्थित होते. यावेळी नितीग गडकरी यांच्या हस्ते ९०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. गोंदिया हा धान उत्पादक जिल्हा असून जिल्ह्यात चांगल्या प्रतीचा तांदूळ उत्पादित होतो. शिवाय रेल्वे मार्गाचे जाळे पसरले असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही राज्ये लागून आहे. त्यामुळे या व्यापारिक दृष्टिकोनातून या शहराचे महत्त्व फार आहे. शहरात रस्ते आणि उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे विकासाला वाव मिळण्यास मदत होणार आहे असल्याचे गडकरी यांनी सांगितले. खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, कुठलाही पक्षभेद न मानता केवळ विकासाचा दृष्टिकोन बाळगून सर्वांना सहकार्य करणारे नितीन गडकरी हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. तिरोडा-कटंगी-बालाघाट या रिंग रोड रस्त्याची निर्मिती आणि एमआयडीसी परिसरात ड्रायपोर्ट स्थापन करण्याची मागणी गडकरी यांच्याकडे केली. खा. सुनील मेंढे, अशोक नेते यांनीसुद्धा यावेळी जिल्ह्यातील काही रस्त्यांचे प्रश्न आणि विकासकामांची मागणी गडकरी यांच्याकडे केली. तर आ. विनोद अग्रवाल यांनी गोंदिया-कामठा-आमगाव रस्ता, गोंदिया बालाघाट मार्गाचे चौपदरीकरण व उड्डाणपूल बांधकामाची मागणी गडकरी यांच्याकडे केली. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनो, तेलबिया पिकांची लागवड करा - धानाला फार काळ भविष्य नसून देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन होत असल्याने किंमत खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे धानाला पुढे चांगले भविष्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखत पीक लागवड पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी सूर्यफूल, सोयाबीन, जवस, तीळ आदी पिकांची लागवड करून उत्पादन घ्यावे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ करण्यास निश्चित मदत होईल, असे गडकरी यांनी सांगितले.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातून पेट्रोल हद्दपार करा - पेट्रोल, डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. याला उत्तम पर्याय हा इथेनाॅल असून भंडारा जिल्ह्यातील देव्हाडा येथील साखर कारखान्यात लवकरच ऊस आणि तणसीपासून इथेनाॅल तयार केले जाणार आहे. एकूण ६०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून दररोज पाच हजार लिटर इथेनाॅल तयार केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास मदत होणार असून जवळपास ५ हजार बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनासाठी कटिबद्ध - राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या मातीसाठी गाव तलावांचे खोलीकरण केले जात आहे. यामुळे सिंचन क्षमतेत वाढ करण्यास मदत होत आहे. गोंदिया जिल्ह्यात या माध्यमातून ३९ तलावांची निर्मिती करण्यात आली. तर पांगोली नदीतील गाळाचा उपसा करून या नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव मंजूर करून आपल्याला पाठवावा त्यानंतर लगेच पांगोली नदी पुनरुज्जीवनाच्या कामाला सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.