बाराभाटी : येथील कुंभीटोला गाव गोदिंया-चंद्रपूर राज्य मार्गावर आहे. या रस्त्याचे काम सुरू आहे; पण नेमका या चौकातून गेलेला सिमेंट रस्ता एकाच बाजूने तयार करण्यात आला. अर्धा रस्ता शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीने तसाच ठेवला आहे. परिणामी या चौकातून ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. डांबरीकरणासह काही ठिकाणी सिमेंटचा रस्ता तयार करणे सुरू आहे. मात्र कामाची गती फारच मंद असल्याने अद्यापही काम अपूर्णच आहे. या ठिकाणाहून अनेक शाळकरी मुले, बाजाराला येणारे नागरिक, साहित्यखरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रस्ता बांधकामाचा त्रास सहन करावा लागत आहे. या चौकात संगणकाचे ऑनलाईन काम, कपडे खरेदी करणे, आदिवासी संस्थेत धान खरेदी-विक्री करण्यासाठी यावे लागते. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी बाराभाटी, बोळदे, कवठा, येरंडी-देवलगाव, डोंगरगाव, सुकळी, खैरी येथील गावकऱ्यांनी केली आहे.
....
कोट
माझे चौकात कपड्यांचे दुकान आहे. चौकात रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. या रस्त्यावर सातत्याने धूळ उडत असते. यामुळे ग्राहकांनाही त्रास होतो.
- प्रेम फाले (व्यावसायिक)
.....
मी रोजच या मार्गाने प्रवास करतो, मात्र अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने फारच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे.
- प्रभाकर दहीकर, कर्मचारी, येरंडी