अर्जुनी-मोरगाव: कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट दिवसेंदिवस वाढत आहे. विषाणू संसर्गाच्या उद्रेकाने जिल्हा आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. आरोग्य सोयी-सुविधांची कमतरता व योग्यवेळी उपचार मिळत नसल्याने रुग्ण मृत्यूच्या दारात ढकलले जात आहेत. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आली नसतानाच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. यामुळे तालुका स्थळावर सर्व सोयी-सुविधायुक्त डेडिकेटेड कोविड केअर सेंटर (डीसीएचसी) तयार करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत आहे. दररोज बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण दिसून येत आहे. त्यातही आरोग्य विषयक सोयी-सुविधा कमी पडत असल्याने त्याचाही फटका रुग्णांना बसत आहे. उपचारात येणारे व्यत्यय हे जिवावर बेतत आहेत. तालुका स्थळावर बाधितांच्या उपचरार्थ लागणारी व्यवस्थाही कमी पडत आहे. तालुकास्थळी मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळत आहेत. परंतु कोविड केअर सेंटर उभारण्यात आले नाही. त्यामुळे बाधित रुग्णांना उपचारासाठी जिल्हास्तरावरील कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात येते. अशावेळी रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका, ऑक्सिजन मिळणे कठीण जाते. अर्जुनी मोरगाव तालुका ते जिल्हा मुख्यालय गाठण्याकरिता १०० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे अर्जुनी मोरगाव, सडक-अर्जुनी या ठिकाणी आरोग्य सोयी-सुविधांनी युक्त प्रत्येकी १५० बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर (डीसीएचसी) सुरु करावे, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रशासनाकडे केली आहे.
बाॅक्स
तिसऱ्या लाटेचा धोका...
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पहावयास मिळत आहे. दररोज बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गावा-गावात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला आहे. अशा परिस्थितीत तालुका स्तरावर कोविड सेंटर तयार करण्याची गरज होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे जिल्हास्तरावर असलेल्या कोविड सेंटरवर ताण वाढला. आरोग्य सोयी-सुविधा कमी आणि रुग्ण जास्त अशीच परिस्थिती निर्माण झाली.