अंकुश गुंडावार
गोंदिया : गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने आयुष्यमान भारत योजना सुरू केली, पण या योजनेचा लाभ बंगाल, गाडी असणारे आणि गर्भश्रीमंत घेत असल्याची धक्कादायक बाब जिल्ह्यात पुढे आली आहे, तर गरजू लाभार्थी अद्यापही या योजनेपासून दूरच असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
आयुष्यमान भारत योजनेकरिता सन २०१८ मध्ये नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वेक्षण करून यादी तयार करण्यात आली. त्यानंतर, ही यादी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली. या योजनेस पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पंतप्रधानाचे पत्र पाठविण्यात आले. त्यानंतर, यादीत ज्यांच्या नावाचा समावेश आहे, त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आयुष्यमान भारतच्या केंद्रावरून कार्ड तयार करून दिले जात आहे. हे कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना ५ लाख रुपयापर्यंतची शस्त्रक्रिया, तसेच उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ही योजना गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खरोखरच जीवनदायी आहे. गोंदिया जिल्ह्यात योजनेकरिता ६ लाख १,२०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ८५ हजार नागरिकांचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड तयार करण्यात आले आहे, पण इतर शासकीय योजनांप्रमाणेच या योजनेलाही गालबोट लागले आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी पाठविताना, त्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले आणि गर्भश्रीमतांचीही नावे पाठविण्यात आली, तर अनेक गरजू लाभार्थ्यांच्या नावांचा समावेशच करण्यात आला नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून खरे गरजू लाभार्थी अजूनही वंचित आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत असलेली नावे पाहून आरोग्य विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकीत झाले. बंगला, गाडी, आणि गर्भश्रीमंत या योजनेच्या रांगेत असल्याचे चित्र आहे, शिवाय ते कार्ड तयार करून, या योजनेचा पुरेपूर लाभ घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक यंत्रणांनी पाठविलेल्या याद्यांची एकदा चाळणी करून, योग्य लाभार्थ्यांचा यात समावेश करण्याची गरज आहे.
................
२,४०० लाभार्थ्यांनी घेतला लाभ
केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आतापर्यंत जिल्ह्यातील २,४०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेमुळे गोरगरीब रुग्णांना चांगल्या रुग्णालयात उपचार, तसेच महागड्या शस्त्रक्रिया करणेही शक्य झाले आहे.
.............
जिल्ह्यातील १२ रुग्णालयांचा समावेश
आयुष्यमान भारत योजनेत जिल्ह्यातील १२ रुग्णालयांचा समावेश आहे. सहा शासकीय रुग्णालयांत केटीएस, बीजीडब्ल्यू, तिरोडा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय, तर खासगी रुग्णालयांमध्ये बाहेकार हॉस्पिटल, ब्राह्मणकर हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटल, न्यू गोंदिया हॉस्पिटल आणि रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटलचा समावेश आहे.
........
कोण घेऊ शकतो योजनेचा लाभ
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ ज्यांना पंतप्रधानांचे पत्र आले आहे, ज्यांचे नाव यादीत आहे, तसेच रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणारे या योजनेच्या यादीत समाविष्ट असणारेच याचा लाभ घेऊ शकतात.
.......
कोट
आयुष्यमान भारत विमा योजनेंतर्गत नियमित रोगनिदान व माेफत शस्त्रक्रिया केल्या जातात. पैशाअभावी गोरगरीब नागरिक आरोग्यविषयक सोईसुविधांपासून वंचित राहू नये, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या योजनेंतर्गत कार्ड तयार करून लाभ घ्यावा.
- डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक.
..................
आयुष्यमान योजनेचे जिल्ह्यातील एकूण लाभार्थी : ६ लाख १ हजार २००
योजनेचे कार्ड तयार झालेले एकूण लाभार्थी : १ लाख ८५ हजार
या योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी : २,४००
कार्ड तयार होणे शिल्लक असलेले लाभार्थी : ४ लाख १६ हजार २००