गोंदिया : शहरातील स्वामी विवेकानंद कॉलनी मामा चौक येथील तिलकचंद बावनकुळे यांच्या घरून ६० हजारांचा ऐवज पळविणाऱ्या आरोपी विकास उर्फ कालू बळीराम बुराडे (वय २५) याला मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी ५ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी ९ जुलै रोजी करण्यात आली आहे.
स्वामी विवेकानंद कॉलनी मामा चौक, गोंदिया येथील तिलकचंद बावनकुळे यांनी १६ नोव्हेंबर २०२३ रोजी आपल्या घराच्या समोरील दाराला इंटरलॉक लावून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी हा लॉक तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्याचे मंगळसूत्र व २० हजार रोख असा एकूण ६० हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांत भादंविच्या कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आरोपी विकास उर्फ कालू बळीराम बुराडे (वय २५, रा. विजयनगर, मरारटोली, गोंदिया) याला अटक केली होती. त्याच्याजवळून सोन्याचे मंगळसूत्र किंमत ४० हजार व २० हजार रोख असा ६० हजारांचा माल हस्तगत करण्यात आला होता. आरोपी विरुध्द सबळ साक्ष,पुरावे गोळा करण्यात आले.
अशी सुनावली शिक्षासबळ साक्ष-पुराव्यावरून दोष सिद्ध झाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी या प्रकरणातील आरोपीला ५ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार रिना चव्हाण यांनी केला होता. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता कमलेश दिवेवार यांनी बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस हवालदार ओमराज जामकाटे, पोलिस शिपाई रामलाल किरसान यांनी सहकार्य केले.