गोंदिया : पोल्ट्री फार्ममधून कोंबड्या चोरून विकणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून गुन्हा उघडकीस आणला. विशेष म्हणजे, प्रकरणात चोरट्याने सोमवारी चोरी केली, मंगळवारी त्याला अटक झाली, बुधवारी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करून गुरुवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम महागाव येथील सूर्यकांत पिल्लेवान यांच्या पोल्ट्री फार्ममधून सोमवारी रात्री १५ कोंबड्या चोरीस गेल्या होत्या. पोलिसांत भादंवी कलम ४५७, ३८० अंतर्गत गु्न्हा नोंद करण्यात आला आहे. तपास करून पोलिसांनी गावातील पंकड काळसर्पे याला मंगळवारी अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली व कोंबड्या अर्जुनी-मोरगाव येथील एका दुकानदारास पाच हजार रुपयांत विकल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून पाच हजार रुपये जप्त केले व पुरावे गोळा करून बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने सर्व पुराव्यांची पडताळणी करून गुरुवारी आरोपीला १५ दिवस कारावासाची शिक्षा सुनावली.
जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना
गुन्हा घडल्यानंतर लगेच ३ दिवसांत आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावल्याचे हे प्रकरण जिल्ह्याच्या इतिहासात पहिलेच प्रकरण दिसून येत आहे. सोमवारी चोरी व गुरूवारी शिक्षा ३ दिवसांत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू असून पोलीस विभागाचे कौतुक केले जात आहे.