अयोग्य रस्त्यांचा फटका : जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाला माहिती सादरगोंदिया : सुरक्षित प्रवासाचे ब्रीद घेवून धावणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा जिल्ह्यातील नऊ मार्गांवरून आता बाद झाली आहे. सदर नऊ मार्ग पूर्णत: उखडल्यामुळे वाहतुकीसाठी अयोग्य असल्याचे सांगत परिवहन विभागाने त्या मार्गावर एसटी बस चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी असा प्रस्ताव रा.प. महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला आहे.या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून गिट्टी रस्त्यावर पसरली आहे. या मार्गांवर नेहमीच अपघाताची शक्यता असते. जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला सदर खराब रस्त्यांची माहिती देण्यात आली असून दुरूस्तीसाठी प्रस्ताव सादर केल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित ग्रामपंचायत यांना या खराब रस्त्यांची माहिती देण्यात आली आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गांना अपघाताचे मार्ग असे संबोधले जाते. अनेकदा या रस्त्यांवर किरकोळ अपघात घडले आहेत. मोठे अपघात होण्यापासून थोडक्याच बचावले आहे. मात्र रस्ता दुरूस्तीचे काम रखडले आहे. (प्रतिनिधी)रिक्त पदांमुळे फेऱ्या अर्धवट गोंदिया आगारात एकूण ९७ बसेस आहेत. यंत्र साहित्याअभावी दोन बसेस आगारात उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. टायर व बॅटरीचा अभाव गोंदिया आगारात नेहमीच असतो. पूर्वी महिन्याकाठी साहित्याचा स्टॉक उपलब्ध होत असे. परंतु आता असा स्टॉक उपलब्ध राहात नाही. त्यामुळे समस्या उद्भवतात. गोंदिया आगारात ४० वाहकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही फेऱ्या रद्द कराव्या लागतात तर काही फेऱ्या अर्धवटच होतात. काही वाहकांना ओव्हरटाईम करावा लागतो. ५१ ते ५६ यांत्रिकांची पदे मंजूर आहेत. मात्र दर महिन्यांत यातील काही यांत्रिकांची सेवानिवृत्ती होत आहे. त्यामुळे हेड मेकॅनिकसह अनेक यांत्रिकांची पदेही रिक्त आहेत. ही संख्या दर महिन्यात बदलते.
नऊ मार्गांवर बससेवा ठप्प
By admin | Published: September 23, 2016 1:59 AM