बिरसी-फाटा : राज्य शासनाच्या आदेशाने लागू करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे सतत गजबजून राहणाऱ्या तिरोडा येथील बस स्थानकावर शुकशुकाट दिसून आला. त्यात स्थानकाकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे रविवारी (दि.११) स्मशान शांतता दिसून आली. यामुळे आगारातील एकही बस फेरी होऊ शकली नाही व तिरोडा आगाराला नुकसानीला सामोरे जावे लागले.
दररोज पहाटेपासूनच तिरोडा येथून पुसद, यवतमाळ, नागपूर, भंडारा व तुमसरकडे जाणाऱ्या प्रवाशांमुळे तिरोडा स्थानकावर गजबज असते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सतत वाढणारी बाधितांची संख्या लक्षात घेऊन कोरोनाची साखळी तुटावी म्हणून शासनाने लावलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी स्थानकाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे तिरोडा आगारातून धावणाऱ्या एसटीची चाके रविवारी (दि.११) थांबली होती. नेहमीप्रमाणे तिरोडा येथून नागपूरकडे जाणारी तिरोडा आगाराची बस सकाळी ५.३० वाजता फलाटावर लागली होती. मात्र सुमारे २ तास प्रवाशांची वाट पाहूनही एकही प्रवासी बस स्थानकावर फिरकला नाही. परिणामी बस परत आगारात नेऊन उभी करण्यात आली. तसेच दिवसभर कुठल्याही मार्गावर जाणारे प्रवासी न आल्याने तिरोडा आगारातून एकही बस निघाली नाही.