लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षी देशात कोरोनाचा शिरकाव झाला व त्यामुळे २४ मार्चपासून देशात लॉकडाऊन करण्यात आले. अशात व्यापारासह वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे बंदच होती. त्यानंतर ६ मेपासून राज्य रस्ते परिवहन महामंडळाला हळूहळू करून प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या दहशतीने नागरिकांनी प्रवास टाळला होता किंवा खासगी वाहनांनीच प्रवासाला पसंती दिल्याने एसटी स्थानकातच उभी राहिली. अशात महामंडळाला कोट्यवधींचा फटका सहन करावा लागला.
या परिस्थितीतून सावरत असतानाच एसटी आता प्रवाशांना घेऊन धावत होती तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे ग्रहण लागले. यात नागरिकांनी प्रवास पूर्णपणे बंदच केल्याने एसटीला प्रवासी मिळणे कठीण झाले असून, आता महिनाभरापासून एसटी स्थानकात प्रवाशांची वाट बघत उभी असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याने निर्बंधांत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र सहजासहजी नागरिक एसटीने प्रवासाचा धोका स्वीकारत नाहीत. परिणामी, एसटीला आणखी काही काळ प्रवाशांची वाट बघावी लागणार आहे. त्यातही एसटी पुन्हा रस्त्यावर उतरविण्यासाठी आता आगाराला त्यांच्यावर तेल-पाण्याचा खर्च करावा लागणार आहे. एकतर नुकसान त्यात आता एसटी रस्त्यावर उतरवायची म्हणजे आणखी खर्च यामुळे आगारांचेही टेन्शन वाढले आहे.
नाममात्र वर्षभर रस्त्यावर
मागील वर्षी लागलेल्या लॉकडाऊननंतर ६ मेपासून प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार महामंडळाच्या बसेस पुन्हा एकदा प्रवासी सेवेसाठी सज्ज झाल्या व रस्त्यावर उतरल्या. मात्र कोरोनाच्या दहशतीमुळे नागरिकांनी प्रवास बंद किंवा खासगी वाहनानेच कुठेही जाणे पसंत केल्याने प्रवासी वाहतूक सुरू होऊनही एसटी पाहिजे तेवढी धावली नाही. आता दुसऱ्या लाटेत पुन्हा लॉकडाऊन झाले व प्रवाशांविना एसटी स्थानकातच प्रवाशांची वाट बघत उभी असल्याचे चित्र आहे.
आता खर्च किती येणार?
मागील महिना-दीड महिन्यापासून एसटी प्रवाशांविना स्थानकातच उभी आहे. म्हणजेच, त्यांची वाहतूक बंद असल्याने आता त्यांना प्रवासी वाहतुकीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरविण्यासाठी तेल-पाणी करण्याची गरज आहे. अशात त्यांच्यावर सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तरीही आगार व स्थानकात असल्याने त्यांच्यावर लक्ष असून तुटीफुटीचे प्रकार घडलेले नाहीत.
सुमारे १६.५० कोटींचे नुकसान
मागील वर्षी ६ मेपासून एसटीचा प्रवास सुरू झाला. मात्र कोरोनामुळे नागरिकांनी प्रवास टाळला किंवा खासगी वाहनाने प्रवास सुरू केला. यामुळे महामंडळाला चांगलाच भुर्दंड बसला. शिवाय, कित्येक मार्गांवर प्रवासी नसल्याने त्या मर्गांवरील गाड्या बंद कराव्या लागल्या होत्या. आता पुन्हा एप्रिल महिन्यापासून तीच स्थिती निर्माण झाली आहे. एकंदर एसटी वर्षभर सुरू असली तरीही या काळात सुमारे १६ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान दोन्ही आगारांना सहन करावे लागले आहे.
कोरोनामुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने महामंडळाला कोट्यवधींचा फटका सहन करावा लागला आहे. आमच्या आगारांचाही यात समावेश आहे. मात्र खर्च लागूच असल्याने मोठा प्रश्न आहे. तरीही झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, या दिवसांतूनही बाहेर पडू.
- संजन पटले, आगार प्रमुख, गोंदिया.